मुंबई प्रतिनिधी
नारीशक्ती वंदन विधेयकाला संसदेत झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भाजपने वरळी येथे आयोजित केलेल्या महिलांच्या जनआक्रोश मोर्चामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा ताळमेळ बिघडला आणि त्यातूनच एका महिलेच्या संतप्त प्रतिक्रियेमुळे हा मोर्चा चर्चेचा विषय ठरला. या घटनेनंतर राजकीय आंदोलने आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी, तसेच अशा मोर्चांसाठी आवश्यक परवानग्या घेतल्या जातात का, या मुद्द्यांवर नव्याने चर्चा रंगू लागली आहे.
काल (२१ एप्रिल २०२६) रोजी वरळी येथे आयोजित महिलांचा जनआक्रोश मोर्चा हा पूर्णपणे पूर्वनियोजित असून सर्व आवश्यक परवानग्या घेऊनच काढण्यात आला होता. नागरिक आणि वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस व वाहतूक विभागाकडून योग्य नियोजनही करण्यात आले होते. तरीही काही नागरिकांना झालेल्या… https://t.co/oGRhJJafjo
— Ritu Tawde (@TawdeRitu) April 22, 2026
वरळी परिसरात पार पडलेल्या या मोर्चात राज्यभरातून मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. तथापि, मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने संतप्त होत थेट मोर्चातील नेते आणि पोलीस प्रशासनालाच जाब विचारला. तिच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल झाला असून, नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यावर आंदोलनांचा होणारा परिणाम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अधिकृत भूमिका स्पष्ट करत नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली. “वरळी येथे आयोजित महिलांचा जनआक्रोश मोर्चा हा पूर्णपणे पूर्वनियोजित होता. या मोर्चासाठी सर्व आवश्यक परवानग्या संबंधित यंत्रणांकडून घेण्यात आल्या होत्या. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलीस आणि वाहतूक विभागाकडून आवश्यक नियोजनही करण्यात आले होते. तरीदेखील काही नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल मुंबईची प्रथम सेविका म्हणून मी दिलगिरी व्यक्त करते,” असे तावडे यांनी नमूद केले.
तावडे यांनी पुढे विरोधकांवरही टीका करत, “नारीशक्ती वंदन अधिनियम सुधारणा विधेयकाच्या विरोधाच्या माध्यमातून महिलांच्या राजकीय हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात हा आमचा ठाम लढा आहे. महिलांना समान हक्क आणि प्रतिनिधित्व नाकारले जाणार नाही. तप्त उन्हात राज्यभरातून हजारो महिला या मोर्चात सहभागी झाल्या, कारण हा केवळ मोर्चा नव्हता, तर महिलांच्या हक्कांचा आक्रोश होता,” असे स्पष्ट केले.
दरम्यान, शहरातील पायाभूत सुविधांबाबत बोलताना तावडे यांनी कोस्टल रोड, विविध उड्डाणपूल आणि सिमेंट काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांमुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक पूर्वीपेक्षा सुलभ झाल्याचा दावा केला. “महायुती सरकारच्या प्रयत्नांतून उभारण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारली आहे. आमच्या कामाची दखल घेण्याऐवजी विरोधकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
या घटनेमुळे मुंबईसारख्या महानगरात आंदोलनांचे नियोजन, त्यासाठीची परवानगी प्रक्रिया आणि नागरिकांच्या दैनंदिन हालचालींवर होणारा परिणाम या सर्व बाबींचा पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.


