मुंबई प्रतिनिधी
ग्रामीण भागाला शहरांशी जोडणाऱ्या आणि राज्याच्या दळणवळणाचा कणा मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)ला अधिक आधुनिक, आकर्षक आणि जनाभिमुख रूप देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लोकप्रिय अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांची एसटी महामंडळाच्या ब्रँड अॅम्बेसिडरपदी निवड करण्यात आली असून, यासाठी पाच वर्षांचा करार करण्यात येणार आहे.
एसटी बस, अर्थात ‘लालपरी’, ही आजही महाराष्ट्रातील लाखो नागरिकांची जीवनवाहिनी आहे. मात्र, खासगी प्रवासी सेवांच्या वाढत्या स्पर्धेमुळे एसटीच्या प्रवासी संख्येवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर एसटीची प्रतिमा अधिक आधुनिक बनवणे, तरुण प्रवाशांना आकर्षित करणे आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणे या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
प्रवासी आकर्षण आणि सुरक्षा मोहिमांना बळ
महामंडळाच्या माहितीनुसार, रितेश–जिनिलिया ही लोकप्रिय जोडी आगामी काळात एसटीच्या जाहिराती, प्रवासी जनजागृती मोहिमा, तसेच ‘रस्ता सुरक्षा अभियान’ यामध्ये सक्रिय भूमिका बजावणार आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्यासाठी भावनिक आणि सामाजिक स्तरावर संवाद साधण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयासाठी पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्याच्या परिवहन व्यवस्थेला नवी ओळख देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
परंपरा आणि नव्या पिढीचा संगम
एसटी महामंडळासाठी यापूर्वी मकरंद अनासपुरे आणि दिवंगत विक्रम गोखले यांनी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून काम केले होते. आता नव्या पिढीतील लोकप्रिय चेहऱ्यांमुळे ग्रामीण व शहरी भागांतील प्रवाशांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्याचा महामंडळाचा मानस आहे.
‘राजा शिवाजी’मुळे चर्चेत
दरम्यान, रितेश आणि जिनिलिया देशमुख ही जोडी त्यांच्या आगामी राजा शिवाजी या ऐतिहासिक चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असून जिनिलिया देशमुख महाराणी सईबाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
एसटीच्या नव्या ब्रँडिंग उपक्रमामुळे ‘लालपरी’ला आधुनिकतेचा स्पर्श मिळण्यासोबतच प्रवाशांचा विश्वास पुन्हा दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


