नवी दिल्ली वृत्तसंस्था
महिला आरक्षणाच्या घटनादुरुस्ती विधेयकाला लोकसभेत आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने ते फेटाळले गेल्यानंतर देशातील राजकारण तापले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “महिला आरक्षणाला विरोध करून काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि समाजवादी पक्ष यांनी महिलांच्या राजकीय हक्कांची भ्रूणहत्या केली,” अशी घणाघाती टीका करत मोदींनी या पक्षांना त्यांच्या कृतीची राजकीय किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला.
शनिवारी रात्री दूरचित्रवाणीवरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात मोदी म्हणाले की, महिला आरक्षणाकडे देशातील कोट्यवधी महिला मोठ्या आशेने पाहत होत्या. मात्र विरोधकांच्या भूमिकेमुळे त्यांची स्वप्ने भंगली. “संसदेत झालेले दृश्य केवळ बाकांवर थाप मारण्यापुरते नव्हते, तर ते महिलांच्या सन्मानावर आघात होते,” असे ते म्हणाले. विधेयक मंजूर करण्यात अपयश आल्याबद्दल त्यांनी खेदही व्यक्त केला.
विधेयक पुन्हा आणण्याचा निर्धार
महिला आरक्षण लागू करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची पुनरुच्चार करत मोदींनी हे विधेयक पुन्हा संसदेत मांडले जाईल, असे संकेत दिले. “देशातील प्रत्येक महिलेला आश्वस्त करतो, आरक्षणाच्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर करू,” असे ते म्हणाले.
फेररचना वादावर स्पष्टीकरण
विरोधकांनी महिला आरक्षणाला मतदारसंघांच्या फेररचनेशी जोडल्याचा मुद्दा उपस्थित करत दक्षिणेकडील राज्यांचे नुकसान होईल, असा आरोप केला होता. मात्र मोदींनी हा दावा फेटाळत, “हे विधेयक कोणाकडून काही हिरावून घेण्यासाठी नव्हते, तर सर्वांना समान संधी देण्यासाठी होते,” असे स्पष्ट केले. सर्व राज्यांचे प्रतिनिधित्व समप्रमाणात वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
‘नारी शक्ती वंदन’ महायज्ञ
‘नारी शक्ती वंदन’ ही केवळ राजकीय योजना नसून महिलांच्या सक्षमीकरणासाठीची व्यापक मोहीम असल्याचे सांगत मोदी म्हणाले की, २१व्या शतकातील महिलांना संधींची नवी दारे उघडण्याचा हा प्रयत्न होता. देशाच्या प्रगतीत महिलांचा समान सहभाग सुनिश्चित करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
काँग्रेसवर निशाणा
काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले की, “सुधारणा हा शब्द ऐकला की काँग्रेस त्याला रोखण्याचा प्रयत्न करते.” सीमावाद, ‘वन रँक वन पेन्शन’ आणि ओबीसी प्रश्न यांसारखे मुद्दे प्रलंबित ठेवण्यात काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. घराणेशाहीवर चालणाऱ्या पक्षांना सशक्त महिला नेतृत्व धोकादायक वाटते, असा दावाही त्यांनी केला.
विरोधकांचा प्रतिहल्ला
दरम्यान, काँग्रेसने मोदींच्या भाषणावर तीव्र टीका केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधानांनी “देशाला उद्देशून भाषणाऐवजी राजकीय टीका केली,” असा आरोप केला. सध्याच्याच लोकसभेत महिला आरक्षण लागू करण्याचे आव्हान त्यांनी सरकारला दिले. तसेच भाषणात तथ्याऐवजी आरोपांचा भडिमार केल्याची टीकाही त्यांनी केली.
राजकीय तापमान वाढले
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला मोठा राजकीय धक्का बसला असला, तरी या मुद्द्यावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये तीव्र संघर्ष उभा राहण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात हा विषय पुन्हा संसदेत येणार असून, महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहणार, हे स्पष्ट झाले आहे.


