मुंबई प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमी परिसरात मंगळवारी सकाळपासूनच अभिवादनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहिली.
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी चैत्यभूमी स्मारकावर पुष्पहार अर्पण करून डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. मुंबई महापौर रितू तावडे यांच्यासह विविध मान्यवरही यावेळी उपस्थित होते.
यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, संजय राठोड, तसेच सामाजिक न्याय मंत्री शसंजय शिरसाठ उपस्थित होते. प्रशासकीय स्तरावर मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनीही अभिवादन केले.
याशिवाय खासदार वर्षा गायकवाड, सुप्रिया सुळे, माजी खासदार राहुल शेवाळे, तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आंबेडकर जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी राज्यभरातून अनुयायी दाखल झाले. प्रशासनाकडून सुरक्षेची व वाहतूक व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली होती. शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात अभिवादन कार्यक्रम पार पडला.
डॉ. आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृती मोहीमही यानिमित्त आयोजित करण्यात आल्या होत्या.


