मुंबई, प्रतिनिधी
राज्यात अवकाळी पावसाच्या मालिकेनंतर आता उष्णतेने पुन्हा डोके वर काढले असून पुढील ७२ तास राज्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही भागांत उष्णतेची लाट, तर किनारी पट्ट्यात उष्ण-दमट हवामानामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. दुपारी १ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
कोकण विभागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता असली तरी दमटपणामुळे उकाडा अधिक जाणवणार आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअसदरम्यान राहणार असून कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. दुपारच्या वेळेत उन्हाचा तडाखा अधिक जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्रात मात्र उन्हाची तीव्रता अधिक वाढणार आहे. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत सकाळी काहीसा गारवा असला तरी दुपारनंतर तापमान झपाट्याने वाढणार आहे. या भागात कमाल तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून सांगली व सोलापूर जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. उष्ण व दमट हवामानामुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
मुंबईत सध्या तापमान तुलनेने नियंत्रित असले तरी दमटपणामुळे उकाडा जाणवत आहे. सोमवारी (१३ एप्रिल) शहरात किमान २८ अंश तर कमाल ३० अंश तापमान नोंदवले गेले. आर्द्रतेचे प्रमाण ५७ टक्क्यांवर असून पुढील काही दिवसांत कमाल तापमान ३० ते ३३ अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, शहरातील हवेच्या गुणवत्तेतही घसरण नोंदवण्यात आली आहे. वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) १५४ इतका असून तो ‘Poor’ श्रेणीत मोडतो. त्यामुळे श्वसनाचे त्रास असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या सूचनांनुसार, पुढील काही दिवस नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, हलके व सैल कपडे परिधान करणे, थेट उन्हात जाणे टाळणे आणि आवश्यक असल्यासच बाहेर पडणे आवश्यक आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी अधिक दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर राज्य यंत्रणा सतर्क झाली असून आरोग्य विभागानेही संभाव्य उष्माघाताच्या घटनांसाठी तयारी सुरू केली आहे. पुढील ७२ तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार असून नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज अधोरेखित होत आहे.


