मुंबई प्रतिनिधी
आपल्या वैश्विक स्वरवैभवाने भारतीय संगीतविश्व समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे १२ एप्रिल २०२६ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीसह संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. सोमवारी दादर येथील कै. भागोजी कीर हिंदू स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलातर्फे बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली.
त्यांच्या अंत्यदर्शनासाठी राज्यातील राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची तसेच चाहत्यांची मोठी गर्दी उसळली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली. मंत्री छगन भुजबळ, आशिष शेलार, शंभूराज देसाई, भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, तसेच विविध लोकप्रतिनिधींनी पुष्पचक्र अर्पण करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे, खासदार अनिल देसाई, आमदार रविंद्र चव्हाण, प्रसाद लाड, प्रकाश सुर्वे, महेश सावंत आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे आणि जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठविलेल्या पुष्पचक्राचे अर्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
सोमवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आलेल्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, प्रणिती शिंदे, प्रफुल्ल पटेल, अरविंद सावंत, तसेच आमदार आदित्य ठाकरे, भाई जगताप, सुनील शिंदे, मिलिंद नार्वेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
संगीतविश्वातील ‘स्वरसम्राज्ञी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा भोसले यांनी हिंदी, मराठीसह विविध भारतीय भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या आवाजातील विविधतेने आणि अभिव्यक्तीच्या अचूकतेने अनेक दशकं संगीतप्रेमींना भुरळ घातली.
त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत असून, संगीत क्षेत्रातील ही भरून न निघणारी पोकळी असल्याचे मान्यवरांनी आपल्या श्रद्धांजलीत नमूद केले.


