मुंबई, प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठ येथे समाजप्रबोधनाच्या महान परंपरेचा गौरव करत सह महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त ८ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध वैचारिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी सजलेला ‘संयुक्त जयंती सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांचा जागर घडवून आणण्याच्या उद्देशाने हा सप्ताह आयोजित करण्यात आला असून, विद्यार्थ्यांसह प्राध्यापक आणि समाजातील विविध घटकांचा यात सहभाग राहणार आहे.
या ज्ञानोत्सवाची सुरुवात ८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या ‘नवीन ग्रंथालय’ येथे दुर्मिळ ग्रंथ आणि पुस्तक प्रदर्शनाने होणार आहे. या प्रदर्शनामध्ये समाजसुधारकांच्या विचारधारेवर आधारित दुर्मिळ साहित्य, संशोधनपर ग्रंथ आणि ऐतिहासिक दस्तऐवज मांडण्यात येणार आहेत. भारतीय लोकशाहीचा पाया असलेल्या भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा प्रचार-प्रसार करण्याचा संदेश या प्रदर्शनातून दिला जाणार आहे.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी असतील. त्याच दिवशी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : एक युगपुरुष’ या विषयावर डॉ. सुधीर गाडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी संशोधक विद्यार्थ्यांकडून बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित सादरीकरणही करण्यात येणार आहे.
९ एप्रिल रोजी समाजसेवेचे प्रतीक मानले जाणारे संत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्यावर व्याख्यान आणि एकपात्री प्रयोग सादर केला जाईल. त्याचबरोबर साहित्यसम्राट आन्ना भाऊ साठे यांच्या साहित्यातील बाबासाहेबांचे प्रतिबिंब या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
१० एप्रिल रोजी महाड सत्याग्रह या ऐतिहासिक चळवळीच्या सामाजिक आणि वैचारिक आशयावर चर्चा होणार आहे. याच दिवशी ‘शिवराय ते भीमराय’ या विषयावर जलसा कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी भित्तीचित्र स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.
११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारधारेवर राज्यस्तरीय परिसंवाद होणार असून भीमगीत स्पर्धा, ‘घटनात्मक न्यायशास्त्र’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषद, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि ‘खुले पत्रलेखन’ यांसारखे विविध बौद्धिक उपक्रम पार पडतील. या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्यांची जाण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सप्ताहाचा समारोप १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंती निमित्ताने होणार आहे. या दिवशी ‘संविधान रॅली’चे आयोजन करण्यात आले असून ही रॅली ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन’ ते ‘कवीवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा व साहित्य भवन’ या मार्गावर काढण्यात येईल. रॅलीनंतर प्रख्यात अभ्यासक डॉ. भीमराव भोसले यांचे सार्वजनिक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, सप्ताहातील प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने होणार आहे. त्यामुळे हा सप्ताह केवळ स्मरणोत्सव न राहता सामाजिक जाणीव, वैचारिक जागर आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार घडवून आणणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.


