मुंबई प्रतिनिधी
महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर राज्य प्रशासनात मोठ्या प्रमाणावर बदलांची मालिका सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मंगळवारी (ता. 7 एप्रिल) पुन्हा एकदा वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. यावेळी राज्यातील तब्बल 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, आठ दिवसांच्या आत प्रशासनातील हा दुसरा मोठा फेरबदल ठरला आहे.
सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून (GAD) काढण्यात आलेल्या आदेशानुसार विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. महायुती सरकारने सलगपणे आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून या निर्णयाकडे राजकीय व प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राज्यातील विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना नव्या पदांवर नेमणुका देत सरकारने प्रशासकीय रचनेत बदल करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. शासनाच्या निर्णयानुसार काही अधिकाऱ्यांची बदली महत्त्वाच्या धोरणात्मक विभागांमध्ये करण्यात आली आहे, तर काहींना जिल्हास्तरावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे.
सरकारने जाहीर केलेल्या आदेशानुसार
१) राहुल रंजन माहिवाल (IAS:RR:2005), व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे यांची नियुक्ती सदस्य सचिव, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे येथे करण्यात आली आहे.
२)) श्वेता सिंघल (IAS:RR:2009) यांची नियुक्ती विशेष निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे करण्यात आली आहे.
३) रुचेश जैवंशी (IAS:RR:2009) यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे येथे करण्यात आली आहे.
४) कन्हुराज बागटे (IAS:SCS:2011) यांची नियुक्ती संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, महावितरण, कल्याण येथे करण्यात आली आहे.
५) लक्ष्मण राऊत (IAS:SCS:2015), सचिव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई येथे करण्यात आली आहे.
६) गीतांजली बाविस्कर (IAS:SCS:2015), मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांची नियुक्ती संयुक्त सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.
७) डॉ. दिलीप जगदाळे (IAS:SCS:2015), संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, महावितरण, कल्याण यांची नियुक्ती संयुक्त सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आली आहे.
८) पंकज देवरे (IAS:SCS:2016) यांची नियुक्ती सचिव, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई येथे करण्यात आली आहे.
९) मीनल करणवाल (IAS:RR:2019), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची नियुक्ती प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई येथे करण्यात आली आहे.
१०) करिश्मा नायर (IAS:RR:2021), अतिरिक्त आयुक्त, नाशिक महानगरपालिका यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव येथे करण्यात आली आहे.
११) अमित रंजन (IAS:RR:2022), प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी पांढरकवडा व सहाय्यक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त, नाशिक महानगरपालिका येथे करण्यात आली आहे.
राज्य सरकारने अल्पावधीतच केलेल्या या मोठ्या प्रशासकीय फेरबदलामुळे मंत्रालयासह विविध विभागांमध्ये चर्चा रंगली आहे. नव्या नियुक्त्यांमुळे प्रशासनाची कार्यपद्धती अधिक गतिमान करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात असले, तरी सातत्याने होत असलेल्या बदल्यांमुळे प्रशासनात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा देखील सुरू आहे.


