मुंबई प्रतिनिधी
राज्यात निर्माण झालेल्या गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. उत्तर मध्य मुंबईतील आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक 6 एप्रिल रोजी वांद्रे पूर्व येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गॅस वितरणातील अनियमितता, कृत्रिम दरवाढ आणि वाढता काळाबाजार याविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. अनेक ठिकाणी सिलेंडर उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, अंधेरी परिसरात रांगेत उभे असताना एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचा आरोपही आघाडीने केला आहे.
गॅस टंचाईचा फटका छोट्या व्यावसायिकांनाही मोठ्या प्रमाणावर बसत आहे. हॉटेल व्यवसाय, चहाच्या टपऱ्या, फूड स्टॉल्स तसेच रस्त्यावरचे खाद्यपदार्थ विक्रेते यांना व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. लग्नसमारंभ, धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमधील केटरिंग व्यवसायावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. याशिवाय, वसतिगृहांमध्ये स्वयंपाक बंद पडल्याने विद्यार्थ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने काही ठोस मागण्या मांडल्या आहेत. गॅस सिलेंडरवरील कृत्रिम दरवाढ तातडीने थांबवावी, काळाबाजार रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी, तसेच २५ दिवसांनंतरच गॅस मिळण्याची अट शिथिल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांमध्ये निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेता सरकारने कम्युनिटी किचन सुरू करून प्रत्येक दोन किलोमीटरवर जेवणाची व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
तसेच, केवायसी नसल्याच्या कारणावरून अनेक नागरिकांना गॅस सिलेंडर देण्यास नकार दिला जात असल्याचा आरोप करत तातडीने सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी आघाडीने केली आहे. ‘उज्ज्वला गॅस योजने’अंतर्गत जिल्ह्यात किती नागरिकांना लाभ देण्यात आला याचे लेखापरीक्षण करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, परिस्थिती लवकर सुरळीत न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी, सागर गवळी तसेच उत्तर मध्य मुंबईतील अनेक पदाधिकारी, संघटक महिला पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


