मुंबई प्रतिनिधी
भोंदू अशोक खरात याचे राज्यातील अनेक राजकीय नेत्यांशी कथित फोन कॉल्स झाल्याचा दावा करत कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) सार्वजनिक करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून शिवसेना (ठाकरे गट)च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दमानिया यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
अशोक खरात प्रकरणात बोलताना दमानिया यांनी शनिवारी मोठा दावा केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यात तब्बल १७ वेळा फोन कॉल्स झाल्याचा दावा त्यांनी केला. ही माहिती ‘एआय’च्या माध्यमातून मिळाल्याचे त्यांनी सांगितल्याने वाद अधिकच चिघळला आहे.
या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावरून दमानियांना थेट सवाल करत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. “असे कोणते ॲप आहे ज्यात फोन नंबर टाकला की सीडीआरची माहिती मिळते? इनकमिंग-आउटगोइंग कॉल्स, कॉल ड्युरेशन अशी माहिती नेमकी कशी मिळाली?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अंधारे यांनी आपल्या ट्विटमध्ये दमानियांवर टीका करत म्हटले की, “तुमच्या बाजूने किंवा तुमच्या विरोधात बोलल्याने काही फायदा-तोटा होईल अशा भ्रमात राहू नका. गतकाळातल्या एका स्वयंघोषित समाजसुधारकाची तुम्ही सुधारित आवृत्ती आहात, हे आता सर्वांना समजले आहे.
तसेच, “मी तुम्हाला मुद्द्याचे प्रश्न विचारले आहेत. या प्रकरणाशी संबंधित कोणीही असो, त्याची चौकशी झालीच पाहिजे. पण तुम्ही मूळ प्रश्नाला बगल देत आहात. तुम्हाला सीडीआर दिले कुणी? त्या व्यक्तीवर तुम्ही इतका विश्वास का ठेवला?” असा सवालही त्यांनी केला.
यासोबतच अंधारे यांनी राजकीय संदर्भ देत दमानियांवर अप्रत्यक्ष टीका केली. “भाजपाशी संबंधित प्रकरणे आली की तुम्ही त्यांच्या कार्यक्रमांत व्यस्त असता; आणि इतर वेळी दुबई, अमेरिका किंवा आसाममधून अचानक प्रकट होता,” असे म्हणत त्यांनी टोला लगावला.
सीडीआर फुटीची चौकशी
दरम्यान, या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकमध्ये बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “कोणाचाही सीडीआर मिळवण्याचा अधिकार सर्वसामान्यांना नाही. तो अधिकार केवळ तपास यंत्रणांना आहे. त्यामुळे हा सीडीआर बाहेर कसा आला याची चौकशी करण्यात येईल.
दमानियांचे स्पष्टीकरण
दरम्यान, वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन सीडीआर कसा मिळाला याबाबत स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, “एक तारखेला रात्री बारा वाजता एका व्यक्तीचा मेसेज आला. त्याने खरात यांच्याबाबत माहिती देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर फोनवर बोलताना त्याने माझ्याकडे खरातचा सीडीआर असल्याचे सांगितले.
दमानिया यांच्या मते, दुसऱ्या एका क्रमांकावरून त्यांना सीडीआरची एक्सेल शीट पाठवण्यात आली. “ती व्यक्ती प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असल्याचे सांगितले. त्याच्या डिटेक्टिव्ह कंपनीची माहिती पडताळून पाहिली असता ती योग्य वाटली,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, “मला मिळालेली एक्सेल शीट मी क्लाऊड ॲपवर अपलोड केली. त्यातून संबंधित फोन नंबर कोणाचे आहेत हे शोधता आले. ही माहिती मी डीजी दाते आणि संबंधित तपास यंत्रणांकडेही पाठवली आहे,” असेही दमानिया म्हणाल्या.
दरम्यान, सीडीआरच्या कथित फुटीमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून या प्रकरणाची चौकशी काय निष्कर्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


