सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा परिषदेत सभापती पदाच्या निवडीतून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून विरोधकांनी बहिष्कार टाकून भाजपला सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केला. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत नसल्याची जाणीव झाल्यानेच त्यांनी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला, असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
सातारा जिल्हा परिषदेत सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावानंतर भोसले यांनी प्रसारमाध्यमांसमोर भाजपची भूमिका स्पष्ट केली. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रंजीतसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.
भोसले म्हणाले, “राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य आता रडीचा डाव खेळत आहेत. सभापती पदासाठी अर्ज भरण्यासाठी दहा-बारा वेळा संधी देण्यात आली होती. केवळ पंधरा मिनिटांचा वेळ दिला, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. संपूर्ण प्रक्रिया प्रशासन आणि प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत पार पडली. त्यामुळे आरोपांना कोणताही आधार नाही.”
बहुमत नसल्याची जाणीव
मतदान प्रक्रियेत बहुमताचा मुद्दा निर्णायक ठरणार असल्याची पूर्ण कल्पना विरोधी सदस्यांना होती, असा दावा भोसले यांनी केला. “बहुमत आपल्या बाजूने नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा मार्ग निवडला. जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करून वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला,” असे ते म्हणाले.
सीसीटीव्ही बंद प्रकरणावर स्पष्टीकरण
सभागृहातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याच्या आरोपांवर भोसले म्हणाले, “निवड प्रक्रिया झाल्यानंतर आम्ही सभागृहात आलो. सीसीटीव्ही बंद करण्याचा प्रश्नच येत नाही. अध्यक्ष व उपाध्यक्ष याबाबत योग्य ती माहिती घेतील. गरज भासल्यास चौकशी समितीदेखील नेमली जाऊ शकते.”
यावेळी त्यांनी शिवसेना-राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष टीकाही केली. “भाजपने युती धर्म पाळला आहे. मात्र त्याचे आकलन विरोधी पक्षांच्या नेत्यांना होत नाही. शिपायामार्फत निरोप पाठवलेल्या बैठकींना आम्ही कसे उपस्थित राहणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“सभापती निवड झाली म्हणजे राजकारण संपले नाही”
दरम्यान, राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, “सभापती निवडी झाल्या म्हणजे जिल्हा परिषदेतील राजकारण संपले असे नाही,” असे सांगितले. त्यामुळे जिल्हा परिषदेत पुढील काळातही राजकीय संघर्ष कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जयकुमार गोरे यांचा पलटवार
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही विरोधकांवर जोरदार पलटवार केला. “सीसीटीव्ही चालू होते की बंद, याने निवडणुकीच्या निकालावर काही फरक पडला नसता. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांच्या निवडी कागदोपत्री झाल्या आहेत. त्याचे अधिकृत रेकॉर्ड आणि व्हिडिओ चित्रीकरण उपलब्ध आहे. त्यामुळे निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न निरर्थक आहे,” असे ते म्हणाले.
गोरे पुढे म्हणाले, “जिल्हा परिषद ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची परंपरा असलेली संस्था आहे. त्या विचारांना पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. पालकमंत्री पाच वर्षांचा कार्यकाळ सांगतात; आम्हालाही पुढील पाच वर्षे राज्यकारभार कसा करायचा हे चांगलेच ठाऊक आहे.”
त्यांनी विरोधकांवर सदस्य फोडल्याचा आरोपही फेटाळून लावला. “ज्यांना स्वतःचे सदस्य सांभाळता येत नाहीत, त्यांनी आमच्यावर सदस्य फोडल्याचा आरोप करणे चुकीचे आहे. जे लोक स्वेच्छेने आमच्याकडे आले, त्यांना फोडले असे म्हणता येणार नाही,” असा टोला गोरे यांनी लगावला.
जिल्हा परिषदेत राजकीय वातावरण ढवळून निघाले
सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेत राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. बहिष्कार, आंदोलन आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे आगामी काळातही जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरणांवरून राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


