डोंबिवली प्रतिनिधी
रील बनवून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणारा तथाकथित ‘रील स्टार’ आणि विकासक म्हणून ओळखला जाणारा सराईत गुन्हेगार सुरेंद्र पांडुरंग पाटील (५५) याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल १२ लाख २१ हजार रुपयांचा घातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पाटील हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. जप्त केलेली शस्त्रे विक्रीसाठी ठेवली होती, अशी माहितीही त्यांनी दिली.
गुप्त माहितीवरून छापा
दावडी व्हिलेज येथील पाटीलच्या ‘एकविरा’ नावाच्या बंगल्यावर दोन दिवसांपूर्वी कल्याण गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला. घरातील चपला ठेवण्याच्या कप्प्यात संशय न येईल अशा पद्धतीने हा शस्त्रसाठा लपवून ठेवण्यात आला होता.
पोलिसांना येथे
१) ३ देशी बनावटीची पिस्तुले
२) १ सिक्सर रिव्हॉल्व्हर
३) ७ गावठी कट्टे
४) १ मॅगझिन
५) २ एअर गन
६) ४०५ जिवंत काडतुसे
७) १६७ जिवंत छरे
८)२ लोखंडी तलवारी
९) ३ कोयते
१०) १ लांब सुरा
११) १ बटन चाकू
१२) २ लोखंडी सळया
असा मोठा घातक शस्त्रसाठा सापडला. याशिवाय घरातून ३ लाख ५२ हजार रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली.
१३ गुन्ह्यांची नोंद
पोलिसांच्या माहितीनुसार, पाटीलवर मानपाडा पोलीस ठाणे आणि रामनगर पोलीस ठाणे येथे मिळून १२ गुन्हे दाखल आहेत, तर, महात्मा फुले पोलीस ठाणे येथे एक गुन्हा नोंद आहे. पोलिसांच्या अभिलेखात त्याची सराईत गुन्हेगार म्हणून नोंद करण्यात आली आहे.
जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा कारवाया
सुरेंद्र पाटील एका गुन्ह्यात अटकेत होता आणि नुकताच जामिनावर बाहेर आला होता. मात्र बाहेर येताच त्याने पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरू केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
गुन्हा दाखल, पोलीस कोठडी
या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या तो मानपाडा पोलीस ठाणेच्या पोलीस कोठडीत आहे.
धडक कारवाई करणारे पथक
साहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सर्जेराव पाटील, बळवंत भराडे, उपनिरीक्षक किरण भिसे आणि गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ही कारवाई यशस्वी केली.


