रंजीत मस्के|प्रतिनिधी
कल्याण परिसरात घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना मानपाडा पोलिसांनी मोठी कारवाई करत उल्हासनगर येथून एका सराईत घरफोड्या आरोपीला अटक केली आहे. या आरोपीकडून तब्बल २ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फिर्यादी मोमीन उमर शेख (वय ५९) यांचे कल्याण पूर्व येथील हॉटेल बंद असताना २१ ते २२ मार्चच्या मध्यरात्री दरम्यान आरोपी अनिल संजु रूपवते (वय २०) आणि त्याच्या साथीदाराने शटर वाकवून लॉकरमधील रोख रक्कम व दोन मोबाईल फोन लंपास केले होते. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तब्बल ९५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून आरोपीचा माग काढला. गुप्त बातमीच्या आधारे चक्कीनाका परिसरात सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली. चौकशीत आरोपीने कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ परिसरातील एकूण ७ घरफोड्यांची कबुली दिली आहे.
पोलिसांनी आरोपीकडून १२ मोबाईल फोन, पांढऱ्या रंगाची अॅक्टिवा दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण २,०८,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीला २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
कारवाईतील अधिकारी व कर्मचारी: संजय जाधव, अतुल झेंडे, सुहास हेमाडे, संदिपान शिंदे, जयपालसिंह रजपुत, सागर चव्हाण, सुनिल पवार, सुशांत पाटील, संजु मासाळ, विकास माळी, शिरीष पाटील, केशव भोये, योगेश आडे, महेश झांजुर्णे, अशोक आहेर, विजय आव्हाड, सोपान शेळके.


