नाशिक प्रतिनिधी
जुने खासगी व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चौघांना सातपूर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत अटक केली. तांत्रिक तपास, स्थानिक माहिती आणि वेगवान कारवाईमुळे पोलिसांनी आरोपींना सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले.
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात एका ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, अनोळखी आरोपींनी फिर्यादीच्या कार्यालयातील टॅब चोरी करून त्यामध्ये असलेले विविध मैत्रिणींसोबतचे जुने व्हिडिओ व फोटो मिळवले. त्यानंतर हे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली.
आरोपींनी फिर्यादीकडून सुरुवातीला १० हजार रुपये स्वीकारले. तसेच दबाव आणण्यासाठी फिर्यादीचे काही न्यूड फोटो व व्हिडिओ त्यांनाच व्हॉट्सॲपवर पाठवून धमकावले. या घटनेमुळे घाबरलेल्या फिर्यादीने तत्काळ सातपूर पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने दोन पथके तयार करून तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशनचा मागोवा आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यात आला. आरोपी आडगाव शिवारातील ‘दहावा मैल’ परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली.
पोलिसांना पाहताच आरोपी रस्त्याच्या कडेला असलेल्या बंद गाळ्याच्या मागे लपल्याचे आढळले. पोलिसांनी घेराव घातल्यावर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून चौघांनाही ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आकाश पुंडलिक बकरे (रा. अशोकनगर, सातपूर), प्रकाश रामदास पानपाटील (रा. सातपूर कॉलनी), सूरज सुनील गवई (रा. मोतीवाला कॉलेजजवळ, सातपूर) आणि श्रीपत भीमराव शिंदे (रा. खंबाळे, ता. त्र्यंबकेश्वर) अशी आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त किशोर काळे व सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे तसेच गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ चे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे यांच्यासह शंकर काळे, महाजन, आहेर, खरपडे, दराडे, पारस देशमुख, महेश खांडबहाले, सागर गुंजाळ, सचिन आजबे, अमोल आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.
दरम्यान, पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे खंडणीच्या गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


