रंजीत मस्के|प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ७ लाख ९३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार झाला आहे. ही कारवाई चाकूर तालुक्यातील नळेगाव परिसरात मध्यरात्री सापळा रचून करण्यात आली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाने २ एप्रिल रोजी रात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास नळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेमागे सापळा रचला. यावेळी पांढऱ्या रंगाच्या Hyundai Accent (MH-24 AU 2984) कारला अडवण्यात आले. पोलिसांची चाहूल लागताच एक आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेला, तर दोघांना ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सचिन विठ्ठलराव वडजे (वय २९) आणि अनिल नरहरी टोम्पे (वय ३०) अशी असून फरार आरोपीचे नाव शुभम मुकुंद शेलार (वय ३०) असे आहे. तिन्ही आरोपी हे नळेगाव (ता. चाकूर) येथील रहिवासी आहेत.
गाडीची झडती घेतली असता, मागील सीट व डिग्गीत पांढऱ्या पोत्यांमध्ये विमल पान मसाला, V-1 तंबाखू यांसारखे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. तसेच ही वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली कारही जप्त करण्यात आली. एकूण ७.९३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५, २२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके कार्यरत आहेत.
या कारवाईत पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे व आनंद हल्लाळे यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पथकाचे कौतुक करत जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर अशाच प्रकारच्या कठोर कारवाया पुढेही सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.


