जालना प्रतिनिधी
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गवर जालना जिल्ह्यात बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. महामार्गावर काम करत असलेल्या महिला मजुरांना भरधाव ट्रकने चिरडल्याने सहा महिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की मृत महिलांच्या देहांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून संपूर्ण परिसरात रक्ताचा सडा पडल्याचे हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील कडवंची शिवारात हा अपघात घडला. नागपूरहून मुंबईच्या दिशेने वेगाने येणाऱ्या ट्रकने नियंत्रण सुटल्याने महामार्गावर काम करणाऱ्या महिला मजुरांच्या गटाला जोरदार धडक दिली. ट्रक थेट मजुरांवरून गेल्याने सहा महिला मजूर ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत महिलांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. तसेच घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्या परिसरातीलच मजूर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या भीषण अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला असून ट्रक चालकाला लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


