जालना प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा संघर्षाची भूमिका घेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी कोणताही मंडप, व्यासपीठ किंवा सावलीची व्यवस्था नाकारत थेट शेतशिवारातील मोकळ्या जागेत बाजेवर बसून आंदोलन सुरू केले. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भूमिकेमुळे समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जालना जिल्ह्यात शनिवारी उष्णतेचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कमाल तापमान ४०.५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून दिवसभर निरभ्र आकाश राहणार आहे. सकाळी सुमारे ६० टक्के असलेली हवेतील आर्द्रता दुपारपर्यंत कमी होऊन वातावरण अधिक उष्ण आणि कोरडे होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा प्रतिकूल हवामानात जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा निर्धार कायम ठेवला आहे.
उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी त्यांनी डोक्याला भगव्या रंगाचा रुमाल गुंडाळला असला तरी ते कोणत्याही सावलीशिवाय उघड्या मैदानात बसले आहेत. दुपारच्या सत्रात उन्हाचा तडाखा अधिक वाढण्याची शक्यता असताना त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
उपोषणाला प्रारंभ करण्यापूर्वी समर्थकांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी बाजेवर बसून आंदोलनाची अधिकृत सुरुवात केली. अंतरवाली सराटीकडे राज्यभरातून मराठा बांधवांचा ओघ वाढू लागला असून आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने समर्थक दाखल होत आहेत.
दरम्यान, राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. आरक्षणासंदर्भातील विविध मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. या चर्चेनंतर जरांगे पुढील भूमिका काय घेणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
उपोषणादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर थेट निशाणा साधला. “मला उन्हाचे चटके बसले तरी त्याची झळ सरकारला बसणार आहे,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच आरक्षणासंदर्भातील सरकारी मसुद्यावर चर्चा करण्यासाठी अभ्यासकांना बोलावण्यात आले असून त्यांच्या चर्चेनंतर पुढील निर्णय जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी अनेक आंदोलने केली असली तरी यावेळी कोणत्याही मंडपाशिवाय, थेट कडक उन्हात उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलनाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सावलीत बसून आंदोलन करावे, अशी विनंती विविध स्तरांतून केली जात असली तरी त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अंतरवाली सराटी येथील हे आंदोलन पुढील काही दिवस राज्याच्या राजकारणासह सामाजिक घडामोडींचे केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे आहेत.


