जालना प्रतिनिधी
जाफराबाद तालुक्यात सोशल मीडियावरून पोलिसांना खुलेआम आव्हान देत ‘भाईगिरी’ करणाऱ्या दोन भावांवर पोलिसांनी कठोर कारवाई केल्याची घटना गुरुवारी समोर आली. पोलिसांविरोधात प्रक्षोभक स्टेटस ठेवून स्वतःचे वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कैलास राणुबा बकाल आणि परमेश्वर बकाल या दोघांना जाफराबाद पोलिसांनी ताब्यात घेत ‘खाकी हिसका’ दाखवला. या कारवाईची चर्चा संपूर्ण परिसरात रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देऊळझरी परिसरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर आणि जेसीबी सोडण्यात आले. ही वाहने पोलिस ठाण्यातून बाहेर पडत असताना संबंधितांनी त्याचा व्हिडीओ तयार केला. त्यावर ‘आम्ही कोणालाही घाबरत नाही’ अशा आशयाचे संवाद आणि चिथावणीखोर गाणी लावून तो व्हिडीओ सोशल मीडियावरील स्टेटसवर ठेवण्यात आला.
या स्टेटसमध्ये पोलिसांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरत थेट आव्हानात्मक भूमिका घेतल्याचे समोर आले. “झुला झुल… पण बाप को मत भूल…” अशा स्वरूपातील मजकूर वापरत पोलिसांनाच लक्ष्य करण्यात आले होते. हा प्रकार जाफराबाद पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ हालचाली सुरू करत संबंधितांचा शोध घेतला.
त्यानंतर पोलिसांनी कैलास बकाल आणि त्याचा भाऊ परमेश्वर बकाल या दोघांना ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणल्यानंतर दोघांची चौकशी करण्यात आली. या प्रकरणात पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर डोईफोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कैलास बकाल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीदरम्यान प्रवीण बकाल यालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, या घटनेनंतर संबंधित भावांचा माफीनामा देतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पोलिसांना सोशल मीडियावरून आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची ‘हिरोगिरी’ काही वेळातच उतरल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना जाफराबादचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी सांगितले की, “सोशल मीडियाचा वापर समाजात संवाद वाढवण्यासाठी व्हायला हवा. कायद्याचे उल्लंघन करणे किंवा पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, हे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.”


