मुंबई प्रतिनिधी
राज्यातील अलीकडील निवडणुकांचे पडसाद अजूनही राजकीय पातळीवर उमटत असतानाच उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोठी पावले उचलली आहेत. आगामी निवडणुकांचा विचार करून शिंदे यांनी शिवसेनेतील आमदार आणि खासदारांवर थेट संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवत राज्यातील विविध विभागांसाठी संपर्क प्रमुख आणि सहसंपर्क प्रमुखांची नियुक्ती जाहीर केली आहे.
पक्षाची पकड तळागाळात अधिक मजबूत करणे, सरकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि आगामी निवडणुकांसाठी मजबूत संघटन उभारणे, या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या महत्त्वाच्या विभागांमध्ये अनुभवी नेत्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
विभागीय संपर्कप्रमुखांची नियुक्ती
पक्ष संघटनाची पुनर्बांधणी करताना काही प्रमुख नेत्यांकडे महत्त्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
• दक्षिण कोकण (रत्नागिरी, सिंधुदुर्ग) – किरण सांमत
• उत्तर कोकण (रायगड, पालघर) – भरत गोगावले
• पश्चिम महाराष्ट्र (पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर) – दगडू सकपाळ
• मराठवाडा (धाराशिव, लातूर, बीड, नांदेड) – प्रकाश आंबिटकर
• पूर्व विदर्भ (नागपूर, भंडारा, गोंदिया) – दिपक सांवत
• पूर्व विदर्भ – २ (वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली) – मनिषा कोयंडे
• पश्चिम विदर्भ (अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा) – संजय राठोड
सहसंपर्कप्रमुखांनाही जबाबदारी
याशिवाय काही विभागांमध्ये सहसंपर्कप्रमुखांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
• उत्तर कोकण (रायगड, पालघर) – प्रदिप खाडे
• पश्चिम महाराष्ट्र – हनुमंत जगदाळे
• पश्चिम विदर्भ – पराग पिंगळे
या नियुक्त्यांमुळे प्रत्येक विभागात संघटनात्मक कामाला वेग मिळणार असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.
शिंदेंचा निवडणूकपूर्व ‘मास्टर प्लॅन’
निवडणुका संपताच पक्ष संघटन पुन्हा सक्रिय करण्याच्या सूचना शिंदे यांनी सर्व नेत्यांना दिल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये संघटनाची पकड मजबूत करणे, बूथस्तरावर कार्यकर्त्यांचे जाळे उभे करणे आणि सरकारी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे, या कामांवर विशेष भर देण्यात येणार आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा अशीही आहे की, आगामी निवडणुकांपूर्वी शिवसेनेचे संख्याबळ वाढवण्यासाठी शिंदे गटाकडून मोठी रणनीती आखली जात आहे.
‘ऑपरेशन तुतारी’वर ब्रेक?
दरम्यान, ‘ऑपरेशन तुतारी’ या नावाने विरोधी गटातील काही खासदारांना आपल्या बाजूला वळवण्याची रणनीती शिंदे गटाकडून आखली गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या योजनेनुसार ‘तुतारी’ चिन्ह असलेल्या गटातील सहा आणि उबाठा गटातील सहा असे एकूण १२ खासदार आपल्या बाजूला आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते.
मात्र या हालचालींना अद्याप भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळालेला नसल्याची माहिती समोर येत आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार, अशा हालचालींसाठी वेगळ्या राजकीय मार्गाचा अवलंब करण्याचा सल्लाही देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या अलीकडील दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील सत्ताधारी आघाडीत राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकूणच, निवडणुकांचे पडसाद ओसरत असतानाच शिवसेना संघटन अधिक मजबूत करण्यासाठी शिंदे यांनी घेतलेली ही पावले आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरू शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.


