ठाणे प्रतिनिधी
राज्यात तसेच देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये वाढत्या जातीय भेदभावाच्या घटनांच्या निषेधार्थ ‘सामाजिक समता आंदोलन’च्या वतीने येत्या ४ एप्रिल रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी २ ते ४ या वेळेत हे आंदोलन होणार असून विविध सामाजिक, विद्यार्थी आणि प्रगतिशील संघटनांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे.
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्च शिक्षण संस्थांमध्ये ओबीसी, दलित, आदिवासी तसेच भटके-विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्याय आणि भेदभावाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेल्या UGC रेग्युलेशन २०१६ ची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि समताधिष्ठित शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी शासनाने ठोस धोरणात्मक पावले उचलावीत, अशी मागणीही या आंदोलनातून करण्यात येणार आहे.
या आंदोलनाद्वारे काही महत्त्वाच्या मागण्या पुढे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये UGC रेग्युलेशन २०१६ तात्काळ लागू करणे, रोहित वेमुला प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र कायदा करणे, देशात जातीनिहाय जनगणना राबवणे, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची अंमलबजावणी करणे, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करणे तसेच शिक्षणातील खासगीकरणामुळे आरक्षणावर होणारा परिणाम कमी करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी पुढे केली आहे.
आयोजकांच्या मते, देशातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांवरील अन्यायाचे प्रमाण वाढत असून यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य आणि शैक्षणिक आयुष्यावर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देत तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
या आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघ, विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, डाव्या विचारसरणीच्या संघटना तसेच संविधानवादी घटके सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढणाऱ्या सर्व घटकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता लक्षात घेता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


