मुंबई प्रतिनिधी
धडाकेबाज आणि शिस्तप्रिय कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारने 31 मार्च रोजी जाहीर केलेल्या प्रशासकीय फेरबदलात मुंढे यांची मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य, महसूल आणि वन विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. यापूर्वी ते दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते.
मुंढे यांच्या सततच्या बदल्यांचा विषय राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात कायम चर्चेत असतो. विशेष म्हणजे, गेल्या 21 वर्षांत त्यांची तब्बल 25 वेळा बदली झाली आहे. कडक प्रशासन, नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि भ्रष्टाचाराविरोधातील ठाम भूमिका यामुळे ते अनेकदा राजकीय वादांच्या केंद्रस्थानी राहिले आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे. कारण महसूल विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी मुंढे यांचे पूर्वी मतभेद झाले होते. त्यामुळे या नव्या नियुक्तीमुळे प्रशासन-राजकारणातील समीकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत.
2016 मध्ये नवी मुंबई महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत असताना मुंढे यांनी अनधिकृत बांधकामे व फेरीवाल्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. या कारवाईमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली होती आणि त्यावेळी गणेश नाईक व त्यांच्या समर्थकांशी त्यांचा वाद झाला होता.
तसेच 2021 मध्ये नागपूरमध्ये कार्यरत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशीही प्रशासकीय कार्यपद्धती आणि राजकीय हस्तक्षेपाच्या मुद्द्यावरून त्यांचे मतभेद झाले होते. त्यामुळे नव्या पदावर रुजू झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रशासन-राजकारणातील तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तुकाराम मुंढे : बदल्यांची क्रमवारी (2005–2026)
१) ऑगस्ट 2005 – प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी, सोलापूर
२) सप्टेंबर 2007 – उपजिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग
३) जानेवारी 2008 – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नागपूर
४) मार्च 2009 – आयुक्त, आदिवासी विकास विभाग
५) जुलै 2009 – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम
६) जून 2010 – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कल्याण
७) जून 2011 – जिल्हाधिकारी, जालना
८) सप्टेंबर 2012 – विक्रीकर सहआयुक्त, मुंबई
९) नोव्हेंबर 2014 – जिल्हाधिकारी, सोलापूर
१०) मे 2016 – आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका
११)) मार्च 2017 – मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएमएल, पुणे
१२) फेब्रुवारी 2018 – आयुक्त, नाशिक महानगरपालिका
१३) नोव्हेंबर 2018 – सहसचिव, नियोजन विभाग
१४) डिसेंबर 2018 – प्रकल्प संचालक, राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई
१५) जानेवारी 2020 – आयुक्त, नागपूर महानगरपालिका
१६) ऑगस्ट 2020 – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
१७) जानेवारी 2021 – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, भारत
१८) सप्टेंबर 2022 – आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान
१९) नोव्हेंबर 2022 – नियुक्तीच्या प्रतीक्षेत
२०) एप्रिल 2023 – सचिव, पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग
२१) जून 2023 – सचिव, मराठी भाषा विभाग
२२) जुलै 2023 – सचिव, दुग्धविकास व पशुसंवर्धन विभाग (कृषी)
२३) जून 2024 – विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई
२४) जुलै 2025 – सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय
२५) 31 मार्च 2026 – सचिव, आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य, महसूल व वन विभाग, मंत्रालय
येथे बदली करण्यात आली आहे.


