गडचिरोली प्रतिनिधी
लग्नाचा आनंद साजरा करून परतणाऱ्या वरातीवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली आहे. गडचिरोली–चामोर्शी मार्गावर स्कॉर्पिओ आणि प्रवासी ट्रॅव्हल्स बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सायंकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास कुरुड–कढोली गावादरम्यान असलेल्या नाल्याजवळील धोकादायक वळणावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, MH 46 P 5392 क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी लग्नाची वरात घेऊन परतत होती. रामपूर येथे लग्न समारंभ आटोपून ही गाडी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास भाडभीडी मोकासा गावाकडे निघाली होती. या स्कॉर्पिओमध्ये एकूण १६ जण प्रवास करत होते.
दरम्यान, गडचिरोलीहून चामोर्शीकडे जात असलेल्या MH 15 CK 5005 क्रमांकाच्या प्रवासी ट्रॅव्हल्स बसशी वळणावर स्कॉर्पिओची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक तात्काळ घटनास्थळी धावून आले आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली.
अपघातानंतर जखमींना तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारासाठी नेत असताना वाटेतच दोघांचा मृत्यू झाला, तर घटनास्थळी तिघांनी प्राण गमावले. उर्वरित जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.
लग्नाचा आनंद साजरा करून घरी परतणाऱ्या कुटुंबांवर अचानक कोसळलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.


