अलिबाग प्रतिनिधी
कधी कधी कार्यकर्त्यांच्या अति उत्साहातून झालेली छोटीशी चूक नेत्यांसाठी मोठा राजकीय वाद निर्माण करू शकते, याचा प्रत्यय सध्या रायगड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका स्थानिक कार्यक्रमात लावण्यात आलेल्या बॅनरवरील फोटोप्रकरणी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना जाहीर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली आहे. या घटनेमुळे रायगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांकडून तटकरे कुटुंबावर टीकेची झोड उठवली जात आहे.
नेमके प्रकरण काय?
रायगड जिल्ह्यातील इंदापूर विभागात २७ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद व पंचायत समितीतील नवनियुक्त सदस्यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. या कार्यक्रमाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचीही उपस्थिती होती.
मात्र कार्यक्रमाच्या मंचावर लावण्यात आलेल्या बॅनरवर पक्षातील काही प्रमुख नेत्यांचे फोटो नसल्याने वाद निर्माण झाला. बॅनरवर स्थानिक पदाधिकारी तसेच तटकरे कुटुंबातील सुनील तटकरे, आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांचे फोटो होते; मात्र दिवंगत नेते अजित पवार आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचे फोटो त्यावर नव्हते. या कारणामुळे कार्यक्रमाचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होताच राजकीय वादाला तोंड फुटले.
विरोधकांची जोरदार टीका
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमांवरून टीका केली. “मालकाला बाजूला सारून जेव्हा बटाईदारच सातबारा आपल्या नावावर करतो, त्याचे जिवंत उदाहरण,” असे म्हणत त्यांनी तटकरे कुटुंबावर निशाणा साधला.
त्याचप्रमाणे आमदार अमोल मिटकरी यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, त्यांचाच फोटो हटवला जात असेल तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता ते कधीही सहन करणार नाही. दैवतांना डावलून स्वतः देव बनण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सहन करणार नाही,” असे म्हणत त्यांनी पक्षाच्या प्रोटोकॉलची आठवण करून दिली.
मंत्री आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर मंत्री आदिती तटकरे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट करत या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले आणि झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, स्थानिक पातळीवर होणारे कार्यक्रम कार्यकर्त्यांकडून आयोजित केले जातात. अशाच एका ग्रामपंचायत पातळीवरील कार्यक्रमात दिवंगत नेते अजित पवार आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचा फोटो बॅनरवर राहून गेला. “या चुकीबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच त्यांनी पुढे म्हटले की, “अजितदादा असतील किंवा सुनेत्राकाकी असतील, त्यांचे आमच्या मनातील स्थान अढळ आहे. एका बॅनरवरील फोटोंवरून आमच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये. मात्र या निमित्ताने स्थानिक पातळीवरील एका छोट्या चुकीचा मुद्दा कसा बनवला जातो, हेही लक्षात आले.”
तटकरे कुटुंबावर राजकीय दबाव?
दरम्यान, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात तणाव वाढल्याचे दिसून येत आहे. आमदार रोहित पवार यांनी अलीकडेच खासदार सुनील तटकरे यांच्यावर पक्षावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला होता.
आता या बॅनरप्रकरणावरून पुन्हा एकदा टीका झाल्याने शरद पवार गटाकडून तटकरे कुटुंबाला सातत्याने लक्ष्य केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काळात रायगडमधील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


