गोंदिया प्रतिनिधी
गोंदिया : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत (केटीएस) येणाऱ्या शासकीय नर्सिंग कॉलेजच्या तब्बल ३५ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सर्व विद्यार्थिनींना तातडीने मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या आवारात शासकीय नर्सिंग कॉलेज असून येथे सुमारे १८५ विद्यार्थिनी निवासी राहून नर्सिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थिनींना कॉलेजच्या कॅन्टीनमधून जेवण व नाश्ता दिला जातो. बुधवारी (दि.२५) रात्री विद्यार्थिनींनी कॅन्टीनमधील जेवण केल्यानंतर रात्री उशिरा दोन-तीन विद्यार्थिनींना पोटदुखी व उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले.
मात्र गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास आणखी ३२ विद्यार्थिनींना अचानक पोटदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे एकाच प्रकारची लक्षणे दिसू लागल्याने विषबाधेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व विद्यार्थिनींना तातडीने मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.
दरम्यान, ही विषबाधा नेमकी कॅन्टीनमधील अन्नातून झाली की पाण्यामुळे झाली, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. यासाठी कॅन्टीनमधील अन्न व पाण्याचे नमुने अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक पुरुषोत्तम पटले यांनी सांगितले की, “विद्यार्थिनींना पोटदुखी व उलट्यांचा त्रास झाल्याने त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर असून विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.”
या घटनेमुळे शासकीय नर्सिंग कॉलेजच्या कॅन्टीनमधील अन्नाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.


