अहिल्यानगर प्रतिनिध
भोंदूबाबा अशोक खरात याने महिलांवर केलेल्या अत्याचार प्रकरणातील पीडितांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. कोपरगाव शहरात अशा प्रकारचे व्हिडिओ व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे सोशल मीडिया वापरणाऱ्यांमध्ये आणि विशेषतः व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिन्समध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिक येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरुद्ध महिलांवरील अत्याचारासह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या विशेष तपास पथकाकडून (SIT) सुरू आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील पीडित महिलांची ओळख पटेल असे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर जाणीवपूर्वक पसरवले जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सायबर माध्यमांवर विशेष लक्ष ठेवले होते.
तपासादरम्यान २५ मार्च २०२६ रोजी कोपरगावमधील ‘BMW’ नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ शेअर केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या ग्रुपमध्ये राहुल गंगाधर शिंदे (रा. कोपरगाव) याने संबंधित व्हिडिओ फॉरवर्ड केल्याचे आढळून आले. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत राहुल शिंदे याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान राहुल शिंदे याने हे व्हिडिओ त्याला योगेश पंढरीनाथ आढाव (रा. कोपरगाव) याने पाठविल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी योगेश आढाव यालाही अटक केली. पुढील चौकशीत धक्कादायक बाब समोर आली की, योगेशला हे व्हिडिओ त्याचा मित्र संदीप गर्जे (रा. माजलगाव, जि. बीड) याने पाठवले होते. पोलिसांनी संदीप गर्जे याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात राहुल शिंदे, योगेश आढाव आणि संदीप गर्जे या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २९४ (२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कायद्यांनुसार अश्लील किंवा लैंगिक स्वरूपाचे व्हिडिओ इंटरनेट किंवा सोशल मीडियावर प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून या प्रकरणात अनेक महिला पीडित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीडित महिलांची ओळख उघड होईल असे व्हिडिओ, फोटो किंवा कोणतीही माहिती सोशल मीडियावर शेअर करणे किंवा फॉरवर्ड करणे टाळावे. कोणाकडे असे व्हिडिओ असल्यास ते तात्काळ डिलीट करावेत, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा प्रकारचे व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. सोशल मीडियावर कुठलीही संवेदनशील माहिती किंवा व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी त्याचे कायदेशीर परिणाम लक्षात घ्यावेत, अन्यथा संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात.


