बेळगाव :
कर्जाचा वाढता बोजा आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या तीव्र टंचाईमुळे त्रस्त झालेल्या एका हॉटेल व्यावसायिकाने हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी येथे उघडकीस आली आहे. राम हळ्ळुरी (वय ५०) असे मृत व्यावसायिकाचे नाव असून ते हुक्केरी येथील प्रसिद्ध ‘हनुमान हॉटेल’चे मालक होते. या घटनेमुळे स्थानिक व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हुक्केरी शहरातील जुन्या बसस्थानकाजवळ असलेल्या ‘हनुमान हॉटेल’मध्ये मंगळवारी पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रोजप्रमाणे सकाळी हॉटेल उघडण्याची वेळ असताना हळ्ळुरी यांनी हॉटेलच्या आत गळफास घेऊन जीवन संपविल्याचे समोर आले. काही वेळानंतर परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आला आणि तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच हुक्केरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
प्राथमिक चौकशीत हळ्ळुरी हे गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक अडचणीत असल्याचे समोर आले आहे. हॉटेल व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांच्यावर कर्जाचा मोठा बोजा वाढत चालला होता. त्यातच मागील आठवडाभरापासून स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाल्याने हॉटेलचा व्यवसाय जवळपास ठप्प झाला होता.
मृतांच्या मुलगा उदय हळ्ळुरी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल बंद ठेवावे लागत होते. त्यामुळे रोजच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता. दुसरीकडे भाडे, कर्जाचे हप्ते, वीजबिल आणि इतर खर्च वाढत असल्याने कुटुंबावर आर्थिक ताण वाढत होता. या सततच्या तणावामुळेच राम हळ्ळुरी यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर हुक्केरी परिसरातील हॉटेल व लहान व्यावसायिकांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त होत आहे. गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे छोट्या हॉटेल व्यवसायांना मोठा फटका बसत असल्याची तक्रार व्यावसायिकांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणीही स्थानिक व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.
दरम्यान, हुक्केरी पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


