कराड प्रतिनिधी
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीदरम्यान निर्माण झालेल्या तीव्र वादाच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवड प्रक्रिया रद्द करून ती नव्याने घेण्यात यावी, या मागणीसाठी विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर येथील प्रीतिसंगमावरील दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाचे “गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण” करण्याची घोषणा करण्यात आल्याने या वादाला आणखी धार आली आहे.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळ येथे जाऊन अभिवादन केले होते. या कृतीबाबत नाराजी व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी स्मृतिस्थळ पवित्र करण्यासाठी बुधवारी सकाळी गोमूत्र शिंपडून ‘शुद्धीकरण’ करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे कऱ्हाडमध्ये राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे.
दरम्यान, या मुद्द्यावर शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), काँग्रेस तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले. कऱ्हाडमधील दत्त चौकात झालेल्या या आंदोलनात नगरसेवक विजयसिंह यादव, राजेंद्र माने, अखिल भारतीय मराठा संघाचे अनिल घराळ, सचिन पाटील, मोहन कदम, काँग्रेसचे कऱ्हाड दक्षिण अध्यक्ष नामदेव पाटील, रुपेश मुळे, वैशाली जाधव, विनायक भोसले, विवेक कुराडे पाटील, रोहन विभुते यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप
जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान पोलिसांनी पक्षपाती भूमिका घेतल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. या संदर्भात विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यासह शंभराहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे निर्देश दिल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. या निर्देशांनंतर प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी आणखी तीव्र झाली आहे.
निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उमेदवारांना मतदानाचा अधिकार असताना प्रशासनाने हस्तक्षेप करून तो हिरावून घेतल्याचा आरोप करण्यात आला. संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर पद्धतीने पार पडल्याचा दावा करत ही निवड मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक ही लोकशाही पद्धतीने पार पडायला हवी होती. मात्र प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे प्रक्रिया संशयास्पद झाली आहे. त्यामुळे ही निवड रद्द करून नव्याने मतदान घेण्यात यावे,” अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
‘स्मृतिस्थळ पवित्र करण्यासाठी गोमूत्र शिंपडणार’
निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांनी प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केल्याच्या मुद्द्यावर आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर स्मृतिस्थळ पुन्हा पवित्र करण्यासाठी बुधवारी सकाळी गोमूत्र शिंपडण्यात येईल, अशी घोषणा नगरसेवक विजयसिंह यादव यांनी केली.
या निर्णयामुळे कऱ्हाडमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, जिल्हा परिषद निवडणुकीभोवती निर्माण झालेला वाद आता अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.


