पणजी
गोव्यातील कुडचडे परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, सुमारे २५ ते ३० अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवल्याच्या आरोपाखाली भाजप नेत्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. सोहम सुशांत नाईक (वय २०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो कुडचडे नगरपालिकेतील एका भाजप नगरसेवकाचा मुलगा आहे.
गेल्या तीन वर्षांपासून सोहम हा अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढत होता आणि त्यांचे लैंगिक शोषण करून अश्लील चित्रीकरण करत होता. या व्हिडिओंनी तो पीडित मुलींना ब्लॅकमेल करून त्यांना गप्प राहण्यास भाग पाडत असे. धक्कादायक बाब म्हणजे, तो हे व्हिडीओ आपल्या मित्रांना दाखवून त्याबद्दल बढाई मारत असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.
हा संपूर्ण प्रकार एका खाजगी पार्टीदरम्यान उघडकीस आला. आरोपी सोहम एका पार्टीत आपल्या मित्रांसमोर या कृत्यांबद्दल बोलत होता आणि त्यांना पीडित मुलींचे आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवत होता. ही माहिती बाहेर येताच स्थानिक नागरिकांमध्ये आणि पीडित मुलींच्या पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली.
या घटनेची माहिती मिळताच रविवारी रात्री मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कुडचडे पोलीस ठाण्यावर मोर्चा वळवला. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करत आंदोलकांनी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली. वाढता जनक्षोभ आणि प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आणि सोमवारी पहाटे सोहम नाईक याला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.


