चंद्रपूर प्रतिनिधी
आपल्या प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या पित्याचा पोटच्या मुलीनेच पोलीस प्रियकराच्या मदतीने विष देऊन खून केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे. नैसर्गिक मृत्यू भासवून तब्बल तीन वर्षे हे गुपित दडपून ठेवण्यात आले होते, मात्र घरगुती वादातून या क्रूर कृत्याचा उलगडा झाला. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह चौघांना अटक केली आहे.
जयंत अशोकराव बाल्लावार असे मृत पित्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची मुलगी पोलीस कॉन्स्टेबल आर्या जयंत बाल्लावार (२२, रा. चंद्रपूर), तिचा पती व बडतर्फ कॉन्स्टेबल आशिष महेश शेडमाके (३०, रा. जुना सुमठाणा, भद्रावती), चैतन्य ऊर्फ मोंटी सचिन गेडाम (२२, रा. नवीन सुमठाणा) आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
असा रचला हत्येचा कट
मिळालेल्या माहितीनुसार, आर्या आणि आशिष यांचे २०१२ पासून प्रेमसंबंध होते. मात्र, आर्याचे वडील जयंत यांचा या नात्याला तीव्र विरोध होता. या विरोधाचा काटा काढण्यासाठी दोघांनी जयंत यांना ठार मारण्याचा कट रचला. आशिषने त्याच्या मावसभावामार्फत चैतन्य गेडाम याच्याकडून ५,००० रुपयांत विषाची बाटली विकत घेतली. २४ मार्च २०२३ रोजी आशिषने हे विष आर्याच्या स्वाधीन केले.
मिल्कशेक ठरला जीवघेणा
२५ मार्च २०२३ रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास आर्याने वडिलांना पिण्यासाठी मिल्कशेक दिला, ज्यामध्ये तिने आधीच विष मिसळले होते. मिल्कशेक पिल्यानंतर जयंत बाल्लावार कर्तव्यावर निघून गेले. मात्र, काही वेळातच त्यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यावेळी हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्यात आले होते.
वादातून फुटले गुपित
वडिलांच्या मृत्यूनंतर आर्या आणि आशिषने प्रेमविवाह केला. वडिलांच्या जागी आर्याला अनुकंपा तत्त्वावर पोलीस दलात नोकरीही मिळाली. मात्र, आशिषच्या वादग्रस्त कृत्यांमुळे त्याला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले होते. आपल्या बडतर्फीमागे आर्याचा हात असल्याचा संशय त्याला होता. त्यातच, पोलीस प्रशिक्षण (पासिंग आऊट परेड) पूर्ण झाल्यानंतर आर्या सासरी न जाता माहेरी गेली. या रागातून आशिषने पोलिसांकडे तक्रार केली आणि या संपूर्ण हत्याकांडाचा खुलासा झाला.
रात्रीच झाली अटक
महिला आरोपीला सूर्यास्तानंतर अटक करता येत नसल्याने, ठाणेदार आसिफराजा शेख यांनी न्यायाधीशांची विशेष परवानगी घेतली. सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी वाकडे आणि पीएसआय कृष्णा दरडे यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या. या सर्वांविरुद्ध कलम ३०२, १२०-बी, २०१ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


