स्वप्नील गाडे | प्रतिनिधी
नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात रबाळे पोलीस ठाणे पोलिसांना मोठे यश आले आहे. या प्रकरणी तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून इतर अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी फिर्यादी अनुसया शिंदे या कामावरून घरी जात असताना आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवले. “शेठला मुलगा झाला असून पुढे साडी वाटप सुरू आहे,” असे सांगून त्यांना बोलण्यात गुंतवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सुमारे १ लाख ५४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आरोपींनी काढून घेत पळ काढला. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. अटक आरोपींची नावे अशोक विठ्ठल काळे (२२), विष्णू शिवाजी पवार (२७) आणि लखन उर्फ कार्तिक दारासिंग काळे (१९) अशी असून ते सर्व कोपरखैरणे येथील रहिवासी आहेत. चौकशीत आरोपींनी गुजरात, ठाणे आणि मुंबई शहरात अशाच प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना फसवून दागिने चोरी केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक बनसोडे, पोलीस निरीक्षक संजय गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक खरात, पोलीस हवालदार दर्शन कटके, मयूर सोनवणे, गणेश वीर, धनाजी भांगरे, यादवराव घुले आणि मनोज देडे यांनी सहभाग घेतला.


