कोलापूर प्रतिनिधी
कोडोली, ता. पन्हाळा : सातवे येथील चुकीची फेरफार नोंद दुरुस्त करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले. हणमंत शंकर बदडे (रा. कसबा बावडा) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातवे येथील विक्री झालेल्या प्लॉटचे क्षेत्र खरेदी दस्तामध्ये प्रत्यक्ष क्षेत्रापेक्षा जास्त नोंदले गेले होते. ही चुकीची फेरफार नोंद दुरुस्त करण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. संबंधित दुरुस्ती करण्यासाठी तलाठी बदडे यांनी १० हजार रुपयांची लाच मागितली होती.
या रकमेतून त्यांनी ४ हजार रुपये यापूर्वी स्वीकारले होते. उर्वरित ६ हजार रुपयांसाठी त्यांनी तक्रारदाराकडे वारंवार तगादा लावल्याचे समोर आले. तक्रारदाराच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून सापळा रचला. त्यानुसार बुधवारी बदडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
या कारवाईत पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्यासह संदीप काशीद, सचिन पाटील, कृष्णा पाटील आणि प्रशांत दावणे यांनी सहभाग घेतला.


