कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकत बहुमत मिळवले असतानाही अध्यक्षपदाची निवड कोरमअभावी होऊ शकली नाही. विरोधी गटाचे संचालक अनुपस्थित राहिल्याने निवडणूक प्रक्रिया तहकूब करावी लागली. या प्रकारानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. ‘गोकुळला अमूलच्या दावणीला बांधण्यासाठी तुम्ही हे सगळे कारस्थान करत आहात, हे आम्हाला कळत नाही का?’ असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार विश्वजित कदम यांनीही या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत लोकशाही प्रक्रियेचा आदर राखण्याची मागणी केली आहे.
‘देवेंद्रजी, तुम्ही लोकशाही मानता की नाही?’
राजू शेट्टी यांनी या प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, गोकुळला दूध पुरवठा करणाऱ्या पाच लाख दूध उत्पादकांचा आणि मतदान करणाऱ्या ५ हजार ४०० ठरावधारकांचा हा अपमान आहे. आज अध्यक्षपदाची निवड होणे अपेक्षित होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने विरोधी संचालकांनी कोरम पूर्ण होऊ दिला नाही आणि सभा तहकूब करण्याची वेळ आली, असा आरोप त्यांनी केला.
‘देवेंद्रजी, तुम्ही लोकशाही मानता की नाही? महाराष्ट्रातील राजकीय पक्ष फोडले, संघटना फोडल्या आणि आता केवळ आपल्या पसंतीचा अध्यक्ष होत नाही म्हणून एका नामवंत दूध संघाच्या मागे अशा प्रकारचे शुक्लकाष्ठ लावत आहात. ज्या संस्थेवर लाखो दूध उत्पादकांचे भविष्य अवलंबून आहे, तिच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप कितपत योग्य आहे?’ असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.
‘गुजरात म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी, महाराष्ट्र वसाहत झाली का?’
राजू शेट्टी यांनी गोकुळच्या प्रश्नाला महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राच्या अस्तित्वाशी जोडत गुजरातमधील अमूलचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘एका बाजूला गुजराती कंपनीला आणि दिल्लीकरांना खूश करण्यासाठी तुम्ही जंगलतोड करत आहात. दुसऱ्या बाजूला त्याच गुजरातच्या अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी हे सगळे कारस्थान सुरू आहे. हे आम्हाला कळत नाही का?’
‘गुजरात म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी झालेली आहे, महाराष्ट्र म्हणजे तिची वसाहत झाली आहे आणि तुम्ही तिचे व्हाईसरॉय झालात का? महाराष्ट्राला नेमके कुठे घेऊन चाललात?’ अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
पाच लाख दूध उत्पादक शेतकरी हा प्रकार कधीही विसरणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. ज्या विरोधी बारा संचालकांना दूध उत्पादकांनी निवडून दिले, त्यांनी सभेला अनुपस्थित राहण्याऐवजी आपली जबाबदारी पार पाडावी. संचालक म्हणून काम करायचे नसेल, तर राजीनामे द्यावेत. पोटनिवडणुका घेऊन दुसरे प्रतिनिधी निवडून आणू; मात्र अशा प्रकारांना खपवून घेणार नाही, असे आव्हानही शेट्टी यांनी दिले.


