कोल्हापूर प्रतिनिधी
भुदरगड तालुक्यातील पाटगावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेश दिनकर पिळणकर (५२) गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असून त्यांच्या शोधाबाबत अजूनही ठोस धागा पोलिसांना लागलेला नाही. त्यांच्या बेपत्ता होण्याच्या घटनेत दुचाकी एका ठिकाणी आढळणे आणि काही अंतरावर जंगलात जळालेल्या अवस्थेत अस्थीसदृश अवशेष सापडणे या धक्कादायक बाबींमुळे प्रकरण अधिक गूढ बनले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून या घटनेची तुलना बीड जिल्ह्यातील मस्साजोग प्रकरणाशी केली जात आहे.
पिळणकर हे ७ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे आठच्या सुमारास घरातून जेवणासाठी बाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. काही वेळ उलटूनही संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला; मात्र त्यांचा काहीच मागमूस लागला नाही. दरम्यान तपासादरम्यान पाटगावजवळील कुलकर्णी यांच्या शेताजवळ त्यांची दुचाकी उभी आढळून आली. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवली असता दुचाकी सापडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर जंगलात जळालेल्या अवस्थेत अस्थीसदृश अवशेष सापडले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच गडहिंग्लज उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले आणि भुदरगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोरक्ष चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळावरील जळालेले अवशेष जप्त करून ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. हे अवशेष मानवी आहेत की प्राण्यांचे, याबाबतचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याने तपासाची दिशा स्पष्ट झालेली नाही.
पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतले असून शंभरहून अधिक व्यक्तींची चौकशी केली आहे. पिळणकर यांचा नेमका ठावठिकाणा लागलेला नसल्याने विविध शक्यतांच्या आधारे तपास सुरू आहे. राजकीय, व्यावसायिक किंवा वैयक्तिक वैमनस्यातून काही गैरप्रकार घडला आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. पिळणकर हे काजू उत्पादक आणि हर्बल व्यवसायाशी संबंधित असल्याने त्या क्षेत्रातील वादांचीही पडताळणी केली जात आहे.
दरम्यान तपासाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त करत संविधान हक्क संघर्ष समिती आणि पिळणकर कुटुंबीयांच्या वतीने मंगळवारी कोल्हापूर शहरातील दसरा चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी पिळणकर यांच्या पत्नींसह कुटुंबीयांनी “महेश पिळणकर यांचे नेमके काय झाले?” असा सवाल उपस्थित करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची आठवण ताजी झाली आहे. त्या प्रकरणातही अपहरणानंतर निर्घृण हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले होते. पाटगाव प्रकरणातही दुचाकी एका ठिकाणी आणि काही अंतरावर जळालेले अवशेष सापडल्याने अशाच प्रकारची पुनरावृत्ती झाली नसावी ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पोलिसांकडून न्यायवैद्यक अहवालाची प्रतीक्षा असून त्यानंतरच तपासाला ठोस दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


