मुंबई प्रतिनिधी
राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू असतानाही दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत ना विधानसभेत ना विधान परिषदेत चर्चा होऊ दिली जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. सत्तेतील एखाद्या मोठ्या नेत्याचा या अपघातात हात असण्याची शक्यता असल्यामुळेच चर्चा टाळली जात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.
रोहित पवार यांनी विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती यांची भेट घेऊन या प्रकरणी लक्षवेधी सूचना तसेच स्थगन प्रस्तावाद्वारे सविस्तर चर्चेची मागणी केली असल्याचे सांगितले. मात्र, आजवर दोन्ही सभागृहांमध्ये या विषयावर चर्चा होऊ दिली नसल्याचा दावा त्यांनी केला.
“विधानसभेत आणि विधान परिषदेत आम्ही वारंवार या अपघाताचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्ताधारी जाणीवपूर्वक चर्चा टाळत आहेत. एखाद्या सत्ताधारी मोठ्या नेत्याचा या अपघातात सहभाग असण्याची शक्यता असल्यानेच हा विषय दाबला जात आहे,” असा आरोप रोहित पवार यांनी केला.
पवार यांनी पुढे म्हटले की, या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारच्या (सीबीआय)कडे चौकशी देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात राज्य सरकारला स्मरणपत्रही देण्यात आले आहे. मात्र, अद्याप राज्य सरकारकडून सीबीआय चौकशीसाठी अधिकृत पत्र पाठवण्यात आले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच, या अपघाताशी संबंधित असलेल्या व्हीएसआर एव्हिएशन या विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. “चर्चा टाळून सरकार कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अजितदादांच्या अपघातामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही,” असे ते म्हणाले.
दरम्यान, या प्रकरणावर पुढील काही दिवसांत महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांचे पुत्र जय पवार या आठवड्यात पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. त्यानंतर स्वतः मुंबईत या विषयावर अंतिम पत्रकार परिषद घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात राष्ट्रीय स्तरावरही पाठबळ मिळत असल्याचा दावा करताना पवार म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह दिल्लीतील अनेक नेते या विषयात आम्हाला मदत करत आहेत. तसेच संसदेत संजय राऊत आणि आमच्या पक्षाच्या खासदारांना या विषयावर बोलण्याची संधी दिली जात नसल्याचाही आरोप त्यांनी केला.
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचे सांगत रोहित पवार यांनी या प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्याची मागणी पुन्हा एकदा राज्य सरकारकडे केली आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रकरण राजकीय पातळीवर अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


