मुंबई प्रतिनिधी
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवर (मेनलाईन) वाढत्या गर्दीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आजपासून (सोमवार) मध्य रेल्वेवर १२ डब्यांच्या लोकलऐवजी १५ डब्यांच्या १० नवीन फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यामुळे अंबरनाथ, बदलापूर, कर्जत आणि कसारा या लांबच्या पट्ट्यातून दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासातील रेटारेटी काही प्रमाणात कमी होण्यास मदत मिळणार आहे.
मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील वाढती गर्दी आणि त्यामुळे होणारी प्रवाशांची हेळसांड हा दिवसेंदिवस गंभीर प्रश्न बनला आहे. गर्दीच्या रेट्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत असून अपघातांचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची ही गंभीर समस्या दूर करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
एकूण फेऱ्या कायम, पण प्रवासी क्षमता वाढणार
विशेष म्हणजे, मध्य रेल्वेवरील लोकलच्या एकूण फेऱ्यांची संख्या १८२० इतकीच कायम ठेवण्यात आली आहे. नवीन फेऱ्या वाढवण्याऐवजी सध्याच्या १२ डब्यांच्या लोकलऐवजी १५ डब्यांच्या गाड्या चालवून प्रवासी क्षमता वाढवण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. पीक अवर्समध्ये (गर्दीच्या वेळेत) या १५ डब्यांच्या लोकल धावणार असल्याने स्थानकांवरील आणि डब्यांमधील गर्दीचे विकेंद्रीकरण होण्यास मदत होईल.
१५ डब्यांच्या फेऱ्या आता ३२ वर
मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावर सर्वप्रथम १६ ऑक्टोबर २०१२ रोजी १५ डब्यांची लोकल सेवा सुरू करण्यात आली होती. त्यावेळी अशा १६ फेऱ्या सुरू झाल्या होत्या. त्यानंतर ४ मार्च २०१९ रोजी आणखी ६ फेऱ्या वाढवून ही संख्या २२ वर पोहोचली होती. आता आजपासून (२० जुलै) १० नव्या फेऱ्यांची भर पडल्यामुळे मध्य रेल्वेवरील १५ डब्यांच्या एकूण फेऱ्यांची संख्या ३२ वर पोहोचली आहे. या निर्णयामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रवास अधिक सुखकर होणार आहे.


