नवी मुंबई प्रतिनिधी
ग्राहकांना मोफत शुद्ध पाणी न देणे, अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन करणे आणि सेलिब्रिटींच्या नावाचा वापर करून दिशाभूल करणारी जाहिरातबाजी करणे, या गंभीर कारणांमुळे वाशीतील प्रसिद्ध ‘दिल्ली से’ हॉटेलवर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने मोठी कारवाई केली आहे. तपासणीत तब्बल ४६ टक्के अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आल्यानंतर हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला असून १३ जुलैपासून हॉटेल पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे नवी मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या व्यावसायिकांना एफडीएने स्पष्ट इशारा दिला आहे.
सजग ग्राहकाच्या तक्रारीने उघड झाला प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, अनुज गुप्ता या ग्राहकाने ‘दिल्ली से’ हॉटेलविरोधात एफडीएकडे लेखी तक्रार केली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत एफडीए कोकण सहआयुक्त परिमंडळ-४चे अजित मैत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ११ जुलै रोजी हॉटेलवर अचानक छापा टाकण्यात आला.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या सविस्तर तपासणीत स्वच्छता, अन्न हाताळणी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अन्न साठवणूक, ग्राहक सुविधा आणि इतर अनेक बाबींमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या.
११० पैकी फक्त ५९ गुण; नियमांची सर्रास पायमल्ली
एफडीएच्या निकषांनुसार तपासणीदरम्यान हॉटेलला ११० गुणांपैकी केवळ ५९ गुण मिळाले. म्हणजेच जवळपास ४६ टक्के नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले.
अन्न सुरक्षेसारख्या अत्यंत संवेदनशील विषयात इतक्या मोठ्या प्रमाणात नियम मोडले जात असल्याने ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा निष्कर्ष अधिकाऱ्यांनी नोंदवला. त्यानंतर तुर्भे विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी ज्योत्स्ना जाधव यांनी १३ जुलै रोजी हॉटेलचा परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले.
सेलिब्रिटींच्या नावाने ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
तपासणीदरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. ‘दिल्ली से’ हॉटेलने समाजमाध्यमे आणि संकेतस्थळावर अभिनेत्री अनुष्का शर्मा, क्रिकेटपटू विराट कोहली आणि प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन अभिषेक उपमन्यू हे येथे जेवणासाठी येतात आणि त्यांना येथील खाद्यपदार्थ आवडतात, असा दावा करून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी केली होती.
इतकेच नव्हे, तर विराट कोहली हॉटेलमध्ये आल्याचे छायाचित्रही जाहिरातींसाठी वापरण्यात आले होते. मात्र एका बाजूला सेलिब्रिटींच्या नावाचा गाजावाजा करत ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूला अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, असा दुहेरी प्रकार या कारवाईमुळे समोर आला.
‘मोफत पाणी’चा नियम धाब्यावर
एफडीएच्या नियमांनुसार प्रत्येक हॉटेलमध्ये ग्राहकांना आरओ किंवा फिल्टरचे शुद्ध पाणी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र ‘दिल्ली से’मध्ये हा नियम सर्रास मोडला जात असल्याचे तपासणीत आढळले.
ग्राहकांना मोफत पाणी न देता बाटलीबंद पाणी खरेदी करण्यास भाग पाडले जात होते. विशेष म्हणजे, विक्रीस ठेवलेल्या बाटलीबंद पाण्याचे दर मेन्यूकार्डवर नमूद करण्यात आले नव्हते. त्यामुळे ग्राहकांची आर्थिक फसवणूकही होत असल्याचे निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदवले.
ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड सहन केली जाणार नाही
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे ही प्रत्येक खाद्यव्यवसायाची कायदेशीर जबाबदारी आहे. ग्राहकांना स्वच्छ, सुरक्षित अन्न आणि मोफत शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे बंधनकारक असून त्यात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही.
नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन
अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, एखादे हॉटेल मोफत पिण्याचे पाणी देत नसेल, अन्नाच्या गुणवत्तेबाबत संशयास्पद प्रकार आढळत असतील किंवा ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत असेल, तर तत्काळ एफडीएकडे तक्रार करावी. अशा तक्रारींवर तातडीने कारवाई करून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण केले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या कारवाईमुळे राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचा स्पष्ट संदेश मिळाला असून, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात एफडीएची धडक मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


