बीड प्रतिनिधी
देशभरात NEET परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) प्रक्रियेवर आता निकालानंतरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीने उत्तरतालिकेनुसार (Answer Key) स्वतःला 700 पेक्षा अधिक गुण मिळण्याची खात्री असताना प्रत्यक्ष निकालात केवळ 87 गुण मिळाल्याचा गंभीर दावा केला आहे. या घटनेमुळे परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा शंका उपस्थित होत असून विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीड जिल्ह्यातील वडवण येथील ज्ञानेश्वरी पवार या विद्यार्थिनीने NEET परीक्षेनंतर अधिकृत उत्तरतालिकेच्या आधारे स्वतःचे उत्तरपत्र तपासले. त्यानुसार तिला 700 पेक्षा अधिक गुण मिळतील, असा तिचा आणि कुटुंबीयांचा विश्वास होता. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी तिची निवड निश्चित मानली जात होती. मात्र निकाल जाहीर झाल्यानंतर तिच्या गुणपत्रिकेत अवघे 87 गुण नोंद झाल्याचे दिसून आले. हा निकाल पाहताच विद्यार्थिनीला धक्का बसला आणि तिला अश्रू अनावर झाले.
ज्ञानेश्वरीने दावा केला आहे की, तिने दिलेली उत्तरे आणि अधिकृत उत्तरतालिकेतील उत्तरे यांची पडताळणी केल्यानंतर इतके कमी गुण मिळणे शक्यच नाही. त्यामुळे तिच्या OMR शीट, उत्तरपत्रिका आणि गुणांकन प्रक्रियेत तफावत झाल्याची शक्यता तिने व्यक्त केली आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याची तयारीही कुटुंबीयांनी सुरू केली आहे.
ज्ञानेश्वरीची आई म्हणाली की, मुलीने वर्षभर अत्यंत मेहनत घेतली. मॉक टेस्ट आणि सराव परीक्षांमध्येही तिची कामगिरी उत्कृष्ट होती. उत्तरतालिका तपासल्यानंतर 700 हून अधिक गुण मिळण्याचा विश्वास निर्माण झाला होता. त्यामुळे प्रत्यक्ष निकालात केवळ 87 गुण दिसल्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. “हा निकाल आम्हाला मान्य नाही. आमच्या मुलीच्या OMR शीटची आणि गुणांकनाची सखोल चौकशी व्हावी,” अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, NEET परीक्षेभोवतीचा वाद अद्याप कायम आहे. यापूर्वी पेपरफुटीच्या आरोपांमुळे परीक्षा प्रक्रिया न्यायालयापर्यंत पोहोचली होती. त्यानंतर फेरपरीक्षेचे आयोजन करण्यात आले. आता निकालानंतर अशा प्रकारचे दावे समोर येऊ लागल्याने राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.
शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे की, अशा प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांनी अधिकृत OMR शीट, रिस्पॉन्स शीट आणि उत्तरतालिका यांची पडताळणी करून आवश्यक असल्यास नियमानुसार हरकती नोंदवाव्यात. जर गुणांकनात तांत्रिक किंवा प्रशासकीय त्रुटी आढळली, तर संबंधित यंत्रणेकडून त्याची चौकशी होणे आवश्यक आहे.
दरम्यान, ज्ञानेश्वरी पवारच्या प्रकरणाची सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. अनेक विद्यार्थी आणि पालकांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी केली आहे. संबंधित परीक्षा प्राधिकरणाकडून या दाव्याबाबत अधिकृत भूमिका काय घेतली जाते, याकडे आता राज्यासह देशभरातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.


