मुंबई प्रतिनिधी
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत शिष्यवृत्तीच्या रकमेत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेत सुधारणा करत शिष्यवृत्तीची रक्कम वाढवण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
या निर्णयानुसार ५ वी ते ७ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा २५० रुपये, तर ८ वी ते १० वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ४०० रुपये शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ही सुधारित शिष्यवृत्ती यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा सरकारचा मानस आहे.
याबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मंत्री शिरसाट यांनी माहिती दिली. विद्यमान शिष्यवृत्तीची रक्कम अत्यंत कमी असल्याची कबुलीही त्यांनी दिली. सध्या ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांना दरमहा फक्त ६० रुपये, तर ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना १०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र आता ही रक्कम वाढवून अनुक्रमे २५० आणि ४०० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळवण्यासाठी पुढील आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असून वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर हा निर्णय तातडीने अमलात आणला जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आत या प्रस्तावाला मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही मंत्री शिरसाट यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक आर्थिक आधार मिळणार असून शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


