पुणे प्रतिनिधी
पुणे: शहरात रस्त्याने एकटे चालणाऱ्या नागरिकांचे मोबाईल भरधाव स्पोर्ट बाईकवरून येऊन हिसकावणाऱ्या एका सराईत परप्रांतीय टोळीचा पर्वती पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ८ मोबाईल फोन आणि चोरीची एक ‘यमाहा आर-१५’ मोटारसायकल जप्त केली आहे.
पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोबाईल चोरीच्या दोन घटनांची नोंद झाली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत असताना पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे यांना गुन्ह्यात वापरलेली बाईक नवी मुंबईतून चोरीला गेल्याचे समजले. या चोरीच्या बाईकवर पुणे वाहतूक पोलिसांनी केलेल्या ऑनलाइन चलनाची माहिती काढून पोलिसांनी आरोपींचा माग काढला आणि सापळा रचून त्यांना बेड्या ठोकल्या.
याप्रकरणी १) अर्जुन कमलेश सरोज (१८), २) इमरान शफीक शेख (१८), ३) रवीकुमार राजेंद्रकुमार (२१) आणि ४) प्रदिप कुमार महेंद्रकुमार (२१) या चौघांना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी मूळचे उत्तर प्रदेश आणि झारखंड राज्यातील रहिवासी असून सध्या पुण्यातील आंबेगाव पठार व उंड्री परिसरात वास्तव्यास होते.
ही यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-२) मिलिंद मोहिते, सहा. पोलीस आयुक्त (स्वारगेट विभाग) धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर यांच्या सूचनेनुसार पोलीस उप निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सुर्या जाधव, मनोज बनसोड, नाना सोखाडे, सदाम शेख, अमित चिव्हे, अमोल दबडे व राकेश सुर्वे यांनी केली आहे.


