लातूर प्रतिनिधी
लातूर : शहरातील गर्दीच्या ठिकाणांहून मोटारसायकली चोरी करून त्यांचे स्क्रॅप करून सुटे भाग विकणाऱ्या टोळीचा गांधी चौक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून चोरी केलेल्या मोटारसायकलींचे सुटे भाग तसेच एक मोटारसायकल असा सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत मोटारसायकल चोरीचे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुळ मार्केट, भाजी मार्केट आणि बसस्थानक परिसरातील गर्दीच्या ठिकाणी मोटारसायकल चोरीच्या घटना घडत होत्या. याबाबत विविध गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनिल रेजितवाड यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार विशेष पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी ६ मार्च रोजी सापळा रचून रफिक रहीमसाब शेख (वय ५१, रा. नायगाव उमरगा, ता. चाकूर, जि. लातूर; सध्या एकमिनार मस्जिदजवळ, आजमनगर, लातूर) यास मोटारसायकल चोरी करताना रंगेहात पकडले. त्याच्या ताब्यातून हिरो होंडा कंपनीची HF Deluxe (एमएच-२४ एडी-४२२६) ही अंदाजे २५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली.
चौकशीदरम्यान आरोपीने चोरी केलेल्या मोटारसायकली आपल्या साथीदारांकडे देऊन त्यांचे स्क्रॅप करून सुटे भाग विक्रीस काढत असल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी नजीर शमीम शेख (वय ३८, रा. लालनगर अंबाजोगाई; सध्या सपकाळनगर मळवटी रोड, लातूर), तालीफ महमद शेख (वय ३२, रा. लालनगर अंबाजोगाई; सध्या अब्दुल कलाम नगर, लातूर) आणि युसुफ इस्माईल शेख (रा. पिंटू हॉटेलच्या मागे, लातूर) यांना अटक केली. आरोपींकडून चोरी केलेल्या सहा मोटारसायकलींचे स्क्रॅप करून वेगवेगळे केलेले सुटे भाग जप्त करण्यात आले.
या कारवाईत एक मोटारसायकल आणि सहा मोटारसायकलींचे स्क्रॅप केलेले सुटे भाग असा एकूण सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गांधी चौक पोलीस ठाण्यातील मोटारसायकल चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणी पुढील तपास गांधी चौक पोलीस करत आहेत.
दरम्यान, ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे व साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल रेजितवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोउपनि गणेश चित्ते, सफो राजेंद्र टेकाळे, तसेच पोलीस अंमलदार राम गवारे, प्रकाश भोसले, रविसन जाधव, संतोष गिरी, सचिन चंद्रपाटले, शिवा भाडुळे, गोविंद सरवदे, अनिल कज्जेवाड, राहुल दरोडे, दीपक थोटे आणि चालक गोविंद बेंबडे यांनी सहभाग घेतला.


