मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील एम.एच.बी. पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या तब्बल ६ कोटी ७९ लाख ८५ हजार रुपयांच्या दागिन्यांच्या धाडसी चोरीचा अवघ्या ४५ दिवसांत उलगडा करण्यात मुंबई पोलीस यांना यश आले आहे. या प्रकरणी राजस्थान राज्यातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजल्यापासून १४ जानेवारीच्या पहाटेपर्यंत अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. तिजोरीतील सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान ऐवज असा एकूण सुमारे ६,७९,८५,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. घटनेनंतर तातडीने गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात करण्यात आली.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, तांत्रिक तपास, कॉल डिटेल रेकॉर्डची छाननी तसेच खबऱ्यांकडून मिळालेली माहिती यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. चोरीनंतर आरोपींनी राज्याबाहेर पळ काढल्याचे तपासात निष्पन्न झाले.
तांत्रिक तपासातून आरोपी राजस्थानातील विविध भागांत लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापेमारी करून २८ जानेवारी २०२६ रोजी पहिल्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सखोल चौकशीच्या आधारे आणखी तिघांना अटक करण्यात आली.
अटक आरोपींकडून अंदाजे ४ कोटी ५० लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच सुमारे ५ किलो वजनाचे, अंदाजे १५ लाख रुपये किंमतीचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित मुद्देमालाच्या शोधासाठी तपास सुरू असून त्यासाठी स्वतंत्र पथके कार्यरत आहेत.
या कारवाईत परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त संदीप जाधव, बोरिवली विभागाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त संतोष धनावटे तसेच एम.एच.बी. कॉलनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल आव्हाड, उपनिरीक्षक निलेश पाटील, संदीप गोरडे, वसीम शेख, मंगेश कीरपेकर, संतोष भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संभाजी खरात, तसेच पोलीस कर्मचारी संदीप परीट, बबलू साळुंखे, तिरुपती रेकुलवाड, सतीश देवकर, अर्जुन आहेर, गणेश शेरमाळे, सचिन मंजुळे, सिद्धेश पाटील, योगेश मोरे, सुनील मस्के आणि आदित्य राणे आदींचा सहभाग होता.
आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये दिलासा व्यक्त होत असून, मोठ्या आर्थिक गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना मिळालेल्या यशाची चर्चा शहरात सुरू आहे.


