नवी मुंबई प्रतिनिधी
विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळांवर स्वतःला उच्चशिक्षित, उच्चपदस्थ अधिकारी म्हणून सादर करून घटस्फोटित व एकट्या राहणाऱ्या महिलांना जाळ्यात ओढत आर्थिक व शारीरिक शोषण करणाऱ्या सराईत फसवणूक्याला नवी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. आदर्श प्रशांत म्हात्रे (सूत्रधार) व त्याचा चुलत भाऊ प्रेम म्हात्रे अशी अटक आरोपींची नावे असून, त्यांच्या ताब्यातून ८९ लाख ४० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. या रकमेतील बहुतांश पैसे पीडित महिलांना परत करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आदर्श म्हात्रेने विवाह संकेतस्थळांवर तब्बल १२ बनावट नावांनी नोंदणी करून किमान दहा महिलांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले. स्वप्नील वारुळे, नहुष म्हात्रे, जयेश नाईक, तन्मय म्हात्रे, जयेश पाटील, रुपेश गोवेकर, हेमंत गायकर, रुद्रेश गोधळी, जयेश सोनवणे, आदित्य म्हात्रे, हेमंत गोंधळी, जय पाटील अशा विविध नावांनी त्याने प्रोफाइल तयार केली होती. ‘शास्त्रज्ञ’, ‘केंद्रीय अधिकारी’, ‘संपन्न व्यावसायिक’ अशी खोटी ओळख देत तो महिलांशी संपर्क साधत असे.
रबाळे पोलिस ठाण्यात २९ ऑगस्ट २०२५ रोजी नोंदवलेल्या गुन्ह्याच्या तपासातून या टोळीचा उलगडा झाला. आरोपीने ‘इस्त्रोतील शास्त्रज्ञ’ असल्याचे भासवून एका महिलेशी ओळख वाढवली, लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि ‘गुजरातमध्ये जमीन खरेदी’ या कारणावरून तिला वैयक्तिक कर्ज काढण्यास भाग पाडून मोठी रक्कम उकळल्याचे निष्पन्न झाले.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सतीश भोसले यांनी तांत्रिक तपास व गुन्हे अभिलेखांच्या आधारे आदर्श म्हात्रेला २६ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने बनावट ओळखपत्रे तयार करून, सरकारी खात्यांमध्ये नोकरी असल्याचा भास निर्माण करून महिलांची फसवणूक केल्याची कबुली दिली. त्याच्यावर बनावट कागदपत्रे तयार करणे, सायबर फसवणूक, लैंगिक अत्याचार, लग्नाचे आमिष दाखवणे आदी विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उपायुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांनी सांगितले की, आरोपी महागड्या गाड्यांसमोर व कुटुंबियांसह काढलेले फोटो प्रोफाइलवर टाकून विश्वासार्हता निर्माण करत असे. विशेषतः तातडीने वैयक्तिक कर्ज मिळू शकणाऱ्या बँक खात्यांच्या महिलांची तो निवड करत होता. प्रेम म्हात्रे याच्या बँक खात्यांद्वारे पीडितांकडून पैसे स्वीकारले जात, असेही तपासात स्पष्ट झाले.
२०१९ पासून तो अशा प्रकारचे गुन्हे करीत असून विविध पोलीस ठाण्यांत त्याच्यावर १५ हून अधिक गुन्हे नोंद आहेत. फसवणुकीतून मिळालेला पैसा गोवा-मुंबईतील कॅसिनो, मद्यपान व डान्सबारमध्ये उधळल्याचेही समोर आले. रबाळे पोलिस ठाण्यात सहा महिलांनी तक्रारी दिल्या असून, ९६ लाख ७० हजार रुपयांच्या फसवणुकीपैकी ८९ लाख ४० हजार रुपये जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले.


