अहमदाबाद:
आयपीएलच्या मैदानावर अनेक दिग्गज फलंदाजांनी आपली छाप सोडली आहे; मात्र २०२६ च्या हंगामात एका तरुण फलंदाजाने संपूर्ण स्पर्धेचे लक्ष स्वतःकडे खेचले. वैभव सूर्यवंशीने केवळ धावांचा पाऊस पाडला नाही, तर पुरस्कार आणि विक्रमांच्या जोरावर आयपीएल इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले.
संपूर्ण हंगामात सातत्यपूर्ण आणि आक्रमक फलंदाजी करत वैभवने विक्रमी कामगिरी केली. प्रत्येक सामन्यात चौकार-षटकारांची बरसात करत त्याने प्रतिस्पर्धी संघांच्या गोलंदाजांना अक्षरशः जेरीस आणले. हंगाम संपता-संपता पुरस्कार समारंभात तर परिस्थिती वेगळीच होती – एकामागून एक पुरस्कार आणि प्रत्येक वेळी मंचावर ऐकू येणारे नाव होते वैभव सूर्यवंशी.
एका हंगामात पाच वैयक्तिक पुरस्कार – IPL मध्ये पहिल्यांदाच
अहमदाबादमध्ये झालेल्या समारोप सोहळ्यात वैभवने इतिहास घडवला. एकाच आयपीएल हंगामात पाच वैयक्तिक पुरस्कार जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला.
त्याच्या कामगिरीची दखल घेत त्याला मिळालेले पुरस्कार असे-
ऑरेंज कॅप – सर्वाधिक ७७६ धावा, बक्षीस १० लाख रुपये
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीझन – १० लाख रुपये
इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन – १० लाख रुपये
सुपर सिक्सेस अवॉर्ड – ७२ षटकारांसाठी १० लाख रुपये
सुपर स्ट्राईकर ऑफ द सीझन – टाटा सिएरा कार
विशेष म्हणजे ‘सुपर स्ट्राईकर’ पुरस्कारात त्याला यंदा कार देण्यात आली, तर मागील हंगामात त्याला याच श्रेणीत वेगळे वाहन मिळाले होते.
केवळ पुरस्कार नाही, तर कमाईचाही विक्रम
राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभवचा करार १.१० कोटी रुपयांचा होता. त्याशिवाय प्रत्येक सामन्याचे मानधन आणि पुरस्कारांची रक्कम यामुळे त्याची हंगामातील एकूण कमाई झपाट्याने वाढली.
१६ सामन्यांतून त्याने सुमारे १.२० कोटी रुपये सामन्यांच्या मानधनातून, पुरस्कारांतून ५५ लाख रुपये, तर ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कारांतून आणखी १५ लाख रुपये मिळवले. एकूण कमाई ३ कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
षटकारांचा नवा बादशहा
या हंगामात वैभवने तब्बल ७२ षटकार ठोकत आयपीएलच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला. याआधीचा विक्रम दिग्गज फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर होता. तो विक्रमही वैभवने मागे टाकला.
याशिवाय तो एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा अनकॅप्ड खेळाडू ठरला. कमी वयात आणि कमी चेंडूंमध्ये मोठे टप्पे गाठत त्याने भविष्यातील सुपरस्टार म्हणून स्वतःची ओळख आणखी भक्कम केली.
वयाने तरुण असला तरी खेळाने परिपक्वता दाखवणाऱ्या वैभव सूर्यवंशीने २०२६ च्या आयपीएलमध्ये केवळ विक्रम केले नाहित – तर एका नव्या पिढीच्या आक्रमक टी-२० क्रिकेटची दिशा दाखवली, अशी चर्चा आता क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे.


