नवी दिल्ली वृत्तसंस्था
नव्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल लागू होणार आहेत. रेल्वे तिकीट बुकिंग प्रणाली, डिजिटल पेमेंट सुरक्षाव्यवस्था, मेसेजिंग ॲप्सचा वापर तसेच एलपीजी सिलेंडर दर यांसंबंधीचे सुधारित नियम १ मार्चपासून प्रभावी होतील. या बदलांचा थेट परिणाम प्रवास, घरगुती खर्च आणि मोबाईल वापरावर होण्याची शक्यता आहे.
रेल्वे तिकीट बुकिंगसाठी नवे ॲप अनिवार्य
भारतीय रेल्वेने अनारक्षित व प्लॅटफॉर्म तिकिटांसाठी वापरले जाणारे जुने UTS मोबाईल ॲप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १ मार्चपासून जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट तसेच इतर सेवा एका एकत्रित “Rail One” ॲपद्वारे उपलब्ध होतील. प्रवाशांनी नवे ॲप डाउनलोड करून नोंदणी करणे आवश्यक राहील. मोबाईलद्वारे तिकीट काढणाऱ्या लाखो प्रवाशांवर याचा परिणाम होणार आहे.
UPI व्यवहारात अतिरिक्त प्रमाणीकरण
डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्याच्या उद्देशाने UPI पेमेंट प्रक्रियेत अतिरिक्त सुरक्षा स्तर जोडला जाणार आहे. ठरावीक रकमेपेक्षा जास्त व्यवहार करताना UPI पिनबरोबर बायोमेट्रिक किंवा अतिरिक्त प्रमाणीकरणाची आवश्यकता लागू शकते. तसेच बँक खात्यांतील सरासरी मासिक शिल्लक (Average Monthly Balance) मोजण्याची पद्धतही सुधारित करण्यात येणार असल्याची माहिती वित्तीय क्षेत्रातील सूत्रांनी दिली.
सिमशी संलग्नतेशिवाय मेसेजिंग सेवा बंद
मोबाईल सुरक्षा कडक करण्याच्या दिशेने १ मार्चपासून मेसेजिंग ॲप्स सक्रिय सिमशी जोडलेली असणे बंधनकारक होणार आहे. सिम नसलेल्या किंवा निष्क्रिय सिमवरील खात्यांवरून ॲप्सचा वापर करता येणार नाही. त्यामुळे WhatsApp व Telegram सारख्या सेवांसाठी वैध मोबाईल क्रमांक आवश्यक ठरेल.
एलपीजी सिलेंडर दरांकडे लक्ष
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांकडून घरगुती व व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर जाहीर केले जातात. गेल्या काही महिन्यांत घरगुती सिलेंडर दर स्थिर असले तरी व्यावसायिक सिलेंडरमध्ये चढउतार दिसून येत आहेत. १ मार्च रोजी जाहीर होणाऱ्या नव्या दरांमुळे घरगुती खर्चावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नव्या नियमांमुळे डिजिटल व्यवहार, प्रवास व्यवस्था व मोबाईल सेवा अधिक सुरक्षित व सुसंगत करण्याचा प्रयत्न असल्याचे संबंधित विभागांकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीनंतरच या बदलांचा नागरिकांवरील परिणाम स्पष्ट होणार आहे.


