मुंबई प्रतिनिधी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या चौकशीच्या मागणीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली असून एफआयआर नोंदणी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या प्रकरणात कायदेशीर पर्यायांचा विचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी रोहित पवार यांनी मुंबईतील मरीन ड्राइव्ह तसेच बारामती पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी पुण्यातील सीआयडी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी त्यांनी पुण्यात राज ठाकरे यांची भेट घेऊन संपूर्ण घटनाक्रमाची माहिती दिली. या वेळी राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन निर्णयांचा दाखला देत, अपघाती मृत्यूच्या प्रकरणातही एफआयआर नोंदवणे हा नागरिकांचा अधिकार असल्याचे मत व्यक्त केले, असे रोहित पवार यांनी सांगितले.
“राज ठाकरे यांनी एकच प्रश्न उपस्थित केला—महाराष्ट्रात एका मोठ्या नेत्याच्या मृत्यूबाबतही एफआयआर होत नसेल, तर ही दुर्दैवी बाब आहे. अजितदादा असोत किंवा सामान्य नागरिक, मराठी माणसाला न्याय मिळत नसेल तर त्यासाठी आवश्यक ती पावले उचलू,” असे त्यांनी सांगितल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले.
विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षनेत्यांशी चर्चा करून पुढील कायदेशीर आणि राजकीय भूमिका ठरविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अजित पवार यांच्या मृत्यूच्या कारणांबाबत स्पष्टता आणि चौकशीची मागणी वाढत असून या प्रकरणाला राजकीय व कायदेशीर परिमाण प्राप्त होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


