मुंबई प्रतिनिधी
भारतीय क्रिकेट संघातील आक्रमक फलंदाज रिंकू सिंग यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या वडिलांचे सोमवारी पहाटे निधन झाले. काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत असलेल्या त्यांच्या वडिलांनी यथार्थ रुग्णालय येथे अखेरचा श्वास घेतला.
रिंकू सध्या टी-२० मालिकेसाठी संघासोबत असताना ही दुर्दैवी घटना घडली. वडिलांची प्रकृती खालावल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वीच संघातून तातडीने सुटी घेऊन ग्रेटर नोएडा येथे धाव घेतली होती. २४ फेब्रुवारी रोजी त्यांनी वडिलांची भेट घेतली; हीच त्यांची अखेरची भेट ठरली.
रिंकू यांनी अनेक मुलाखतींमध्ये वडिलांच्या संघर्षमय आयुष्याचा उल्लेख केला होता. घराघरांत सिलेंडर पुरवठ्याचे काम करत त्यांनी मुलाचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न जोपासले. रिंकू भारतीय संघात स्थान मिळवून देशासाठी खेळू लागल्यानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली; मात्र त्याच काळात वडिलांची प्रकृती ढासळत गेली.
अलीकडेच रिंकू यांनी वडिलांना महागडी मोटार भेट दिली होती. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. काही महिन्यांपूर्वीच रिंकू यांचे विवाहबंधन झाले होते. पुढील महत्त्वाच्या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने त्यांच्या क्रीडा कामगिरीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ आणि क्रिकेटवर्तुळातून रिंकू यांना शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.


