मुंबई प्रतिनिधी
देशातील वाहन क्षेत्रात १ एप्रिल २०२६पासून महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार असून केंद्र सरकारच्या हरित इंधन धोरणानुसार देशभरातील सर्व पेट्रोल पंपांवर RON-95 दर्जाचे E20 (२० टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोल उपलब्ध करून देणे बंधनकारक होणार आहे. वायुप्रदूषण नियंत्रण, कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि पर्यायी इंधनाचा वापर वाढवणे या त्रिसूत्री उद्देशातून हा निर्णय अमलात येत आहे.
सरकारच्या निर्देशांनुसार वाहन उत्पादकांनी BS-6 फेज-२ मानकांसह E20-सुसंगत इंजिन तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू केला असून बाजारात येणाऱ्या नव्या कार मॉडेल्समध्ये ही सुसंगतता उपलब्ध होत आहे. मात्र पारंपरिक पेट्रोलसाठी डिझाइन केलेल्या जुन्या वाहनधारकांसाठी हा बदल काही प्रमाणात परिणामकारक ठरणार आहे.
जुन्या वाहनांवर परिणाम
इथेनॉल मिश्रित पेट्रोलमध्ये रासायनिक गुणधर्म वेगळे असल्याने पारंपरिक इंजिनमधील रबर-प्लास्टिक घटकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. इंधन प्रणालीतील झीज वाढणे, सील-पाईप्समध्ये बिघाड निर्माण होणे किंवा कार्यक्षमतेत घट दिसणे अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे E20-सुसंगत नसलेल्या वाहनधारकांनी उत्पादक कंपनीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार देखभाल करणे आवश्यक ठरणार आहे.
मायलेजमध्ये ६-७% घट शक्य
ऊर्जाघनतेत किंचित फरक असल्याने E20 वापरल्यास पारंपरिक पेट्रोलच्या तुलनेत इंधन कार्यक्षमतेत साधारण ६ ते ७ टक्के घट जाणवू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. तथापि उच्च ऑक्टेनमुळे इंजिन नॉकिंग कमी होऊन कार्यप्रदर्शन अधिक सुरळीत राहते.
वाहनांच्या किमतींवर परिणाम
E20-अनुरूप इंजिन विकसित करण्यासाठी अतिरिक्त संशोधन-उत्पादन खर्च वाढत असल्याने नव्या कारच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता वाहन उद्योग क्षेत्राने व्यक्त केली आहे. तथापि सध्याच्या बहुतांश नव्या गाड्या E20 सुसंगत असल्याने नव्या खरेदीदारांना विशेष अडचण येणार नसल्याचे उद्योग क्षेत्राचे मत आहे.
शेतकऱ्यांना अतिरिक्त बाजारपेठ
इथेनॉलचे उत्पादन ऊस, मका व धान्यांपासून होत असल्याने जैवइंधन उद्योगाला चालना मिळून शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्न स्रोत उपलब्ध होणार आहे. कच्च्या तेलाच्या आयातीवरील खर्च कमी होऊन परकीय चलनाची बचत होण्यासही मदत होणार असल्याचा सरकारचा दावा आहे.
प्रदूषण घटविण्यात मदत
नीती आयोग यांच्या अभ्यासानुसार ऊसाधारित इथेनॉल वापरल्यास हरितगृह वायू उत्सर्जनात सुमारे ६५ टक्के तर मक्याधारित इथेनॉलमुळे जवळपास ५० टक्के घट शक्य आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक इंधन म्हणून इथेनॉलचा वापर वाढविण्याला हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
RON म्हणजे काय?
इंधनाची गुणवत्ता दर्शविणारा ‘रिसर्च ऑक्टेन नंबर’ (RON) हा निकष इंजिनमधील ज्वलन स्थैर्याशी संबंधित असतो. RON जास्त असल्यास इंधन उच्च दाब सहन करून नॉकिंग कमी करते. इथेनॉल मिश्रणामुळे पेट्रोलचा RON वाढतो, परिणामी इंजिन कार्यक्षमता सुधारते आणि वाहन चालविताना अधिक सुरळीत अनुभव मिळतो.
एकूणच, १ एप्रिलपासून देशात पेट्रोलच्या स्वरूपात होणारा हा बदल पर्यावरणीय दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात असून वाहनधारकांनी आपल्या वाहनाची E20 सुसंगतता तपासणे आवश्यक ठरणार आहे.


