श्रीरामपूर प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर–संगमनेर मार्गावर रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात शोककळा पसरली आहे. दहा दिवसांपूर्वी नव्याने घेतलेल्या कारमधून गणपती दर्शनासाठी निघालेल्या चव्हाण कुटुंबावर काळाने झडप घातल्याची हृदयद्रावक घटना घडली. मृतांमध्ये तीन वर्षांच्या बालिकेचाही समावेश असून सहा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावाजवळ समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी तीव्र होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला, इंजिन उडाले आणि वाहन रस्त्याच्या कडेला फेकले गेले. कारमध्ये एकूण सात जण प्रवास करत होते.
अपघातात प्रशांत रमेश चव्हाण (२४), संगीता अनिल चव्हाण (४०), सिद्धार्थ सुनील चव्हाण (१६), सारिका अनिल चव्हाण (३०), ऋत्वी अशोक चव्हाण (३) आणि ऐश्वर्या अशोक चव्हाण (२६) यांचा जागीच मृत्यू झाला. रुद्र अशोक चव्हाण (६) हा मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर लोणी येथे उपचार सुरू आहेत.
चव्हाण कुटुंबाने नुकतीच एमएच-०३-एएफ-००५४ क्रमांकाची मारुती सुझुकी स्विफ्ट कार खरेदी केली होती. वाहन घरी आल्याचा आनंद साजरा करण्यासाठी कुटुंबीयांनी खंडाळा येथील गणपती दर्शनासाठी जाण्याचे ठरवले होते. मात्र प्रवासातच नियतीने घाला घातला. कारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या दुर्घटनेने श्रीरामपूर शहरासह परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांची नावे :
प्रशांत रमेश चव्हाण (२४)
संगीता अनिल चव्हाण (४०)
सिद्धार्थ सुनील चव्हाण (१६)
सारिका अनिल चव्हाण (३०)
ऋत्वी अशोक चव्हाण (३)
ऐश्वर्या अशोक चव्हाण (२६)
जखमी : रुद्र अशोक चव्हाण (६) – गंभीर, लोणी येथे उपचार सुरू.


