कर्जत प्रतिनिधी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील मृत्यूबाबत सखोल व निष्पक्ष चौकशीची मागणी सातत्याने करणारे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या जीवितास संभाव्य धोका असल्याचा इशारा देत त्यांना तातडीने ‘झेड प्लस’ सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी कर्जत तालुक्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी संयुक्त निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली. या मागणीसाठी प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत एल्गार व्यक्त केला.
कर्जतमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, जिल्हा उपाध्यक्ष रघु आबा काळदाते यांच्यासह महिला व युवक पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग या निवेदन मोहिमेत दिसून आला. अजित पवार यांच्या मृत्यूभोवतीचे प्रश्न अद्याप अनुत्तरित असून त्याबाबत जनतेमध्ये संशयाचे सावट कायम असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नामदेव राऊत म्हणाले, “अजितदादांच्या मृत्यूमागे केवळ अपघात होता की पूर्वनियोजित घातपात, याचे सत्य समोर येणे ही सर्वसामान्यांची तीव्र अपेक्षा आहे. आमदार रोहित पवार स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या संवेदनशील विषयावर ठामपणे भूमिका घेत आहेत. त्यामुळे हितशत्रूंकडून त्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.”
जिल्हा उपाध्यक्ष रघु आबा काळदाते यांनी देशातील विविध नेत्यांच्या संशयास्पद मृत्यूंचा संदर्भ देत अजित पवार दुर्घटनेच्या चौकशीतील विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “संवेदनशील राजकीय परिस्थितीत रोहित पवार यांना तत्काळ ‘थ्रेट असेसमेंट’ करून सर्वोच्च स्तराची सुरक्षा देणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी नमूद केले.
या वेळी बाळासाहेब शिंदे, पूजा सूर्यवंशी, प्रीती जेवरे, राजेंद्र देशमुख, बाळासाहेब साळुंखे, गुलाब तनपुरे, विशाल मेहेत्रे, नितीन धांडे, अजय नेवसे, डॉ. चंद्रकांत कोरडे, अभय बोरा, डॉ. राजेंद्र पवार, प्रसाद जेवरे, ज्ञानदेव लष्कर, जयसिंग थेटे, दिलीप जाधव, सचिन चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांनीही मनोगते व्यक्त केली.
निवेदनात म्हटले आहे की, अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत अनेक अनुत्तरित प्रश्न उपस्थित झाले असून त्यांची निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे. या संदर्भात सातत्याने आवाज उठवणाऱ्या रोहित पवार यांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन शासनाने तातडीने ‘झेड प्लस’ सुरक्षा मंजूर करावी.
दरम्यान, कर्जत-जामखेड मतदारसंघात या मागणीला स्थानिक स्तरावर मोठा प्रतिसाद मिळत असून पुढील काही दिवसांत या विषयावर व्यापक जनआंदोलन उभारण्याचे संकेत राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी दिले आहेत.


