बोधगया :
बौद्ध धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असलेल्या बोधगया महाविहार परिसरात सुरू असलेल्या ‘बोधगया मुक्ती आंदोलनाला’ महाराष्ट्रातूनही ठाम पाठिंबा व्यक्त करण्यात आला. जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भंतेजींना वंदन करून महाराष्ट्रातील प्रतिनिधींनी “आम्ही सारे बांधव या आंदोलनासोबत आहोत,” अशी ग्वाही मंचावरून दिली. या वेळी भंतेजींनी स्मृतिचिन्ह म्हणून दिलेल्या बुद्धमूर्तींपैकी एक मूर्ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगलकामनारूपाने प्रदान करण्यात आली.
ही बुद्धमूर्ती सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजू वाघमारे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. भंतेजींकडून प्राप्त झालेली ही प्रतीकात्मक भेट शिंदे यांनी कृतज्ञतेने स्वीकारली. त्या वेळीचा क्षण कॅमेऱ्यात टिपण्यात आला. बौद्धगया मुक्तीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला देशविदेशातील भिक्खू व अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्रमोद कराड, माजी नगरसेवक सुमित वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते अमोल निकाळजे, स्वप्निल सरोदे, स्वप्निल दिवार मकरंद तासगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते. भंतेजींकडून मिळालेल्या बुद्धमूर्तीचा स्वीकार करताना उपमुख्यमंत्र्यांनी बौद्ध बांधवांच्या भावना व आंदोलनाशी ऐक्य व्यक्त केले.
बोधगया मुक्ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून व्यक्त झालेला हा पाठिंबा आंदोलनकर्त्यांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.


